

Beed Politics : विलास घुले हत्या प्रकरणात मुलाला अडकवण्याचा प्रयत्न, बदनामीचा राजकीय कट, जातीयवादाचा आरोप यावर शंभर दिवस गप्प राहून बोलणार अशी भूमिका बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी घेतली होती. आपल्याविरोधात कसा सूड भावनेने कट रचला गेला? याचे कॉल रेकॉर्डिंग हाती आल्यानंतर शंभर दिवस शांत राहिलेल्या सोनवणे यांनी गुरुवारी वाल्मीक कराड व आपल्या राजकीय विरोधकांवर डाव टाकला.
वाल्मीक कराड आणि सुग्रीव कराड यांच्यामध्ये झालेल्या संभाषणाची आॅडिओ क्लीप माध्यमांसमोर आणत सोनवणे यांनी एकाच दगडात अनेक पक्षी घायाळ केले आहेत. विलास घुले हत्या प्रकरणात आपल्या मुलाचा कुठलाही संबंध नाही हे सिद्ध करतानाच आपल्या अडकवण्यासाठी बीड कारागृहात कैद असलेल्या वाल्मीक कराड यानेच कसा कट रचला, त्याला कोणाची, कशी मदत झाली? याचा भांडाफोडच बजरंग सोनवणे (Bajrang Sonavane) यांनी केला.
मला बदनाम करण्याचा कट कसा रचला, हे देशाला, महाराष्ट्राला सांगणार आहे. मी शंभर दिवस काही बोलणार नाही, असे सांगीतले होते. केजमधील विलास घुले हत्या प्रकरणाशी माझ्या मुलाचा संबंध नसताना त्याचा घटनाक्रम कसा जुळवला गेला हे मी तुम्हाला सांगणार आहे. जून महिन्यात आम्ही पुण्याला होतो. 18 जूनला 2026 ला माझा मुलगा पुण्याहून केजला सात-ते आठ दरम्यान पोहचला. मी सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या लग्नासाठी मुंबईला गेलो होतो.
मुलाला मतदारसंघातील काही कामांसाठी मी केजला पाठवले होते. 19 रोजी तो मतदारसंघात लग्न समारंभाला हजर राहिला. 20 तारखेला सकाळी दहा वाजता कारखाना, तिथून शेतात आणि नंतर घरी आला. हा सगळा घटनाक्रम पोलीस तपासात आला आहे. तो त्या दिवशीनंतर कुठेच गेला नाही. 21 ला तो कारखाना आणि काही उद्घाटनाच्या कार्यक्रमांना हजर राहून तो रात्री पुन्हा घरी आला. 20 तारखेला घुले यांच्याबद्दलची घटना घडली.
21 रोजी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. मला एका पत्रकाराने फोन करून तुमचे नाव या प्रकरणात येत असल्याचे सांगीतले. पण मी त्यावर फार प्रतिक्रिया दिली नाही. पुन्हा फोन आला आणि तुमच्या मुलाचे नाव यात येत असल्याचे मला कळाले. मग मी पीएकडून माहिती घेतली. 21 नंतर जी फिर्याद दिली त्यात कुठेही माझ्या मुलाचे नाव नाही. ज्याने फिर्याद दिली त्याला माझे किंवा माझ्या मुलाचे नाव घ्यावे, असे वाटले नाही, बजरंग सोनवणे यांनी सांगीतले,
21 रोजी रात्री सात ते आठ दरम्यान, असे काय घडले गेले? ज्यात माझ्याविरोधात कट रचला गेला. हा विषय मला कळाल्यानंतर 22 ला त्यांनी डेडबाॅडी न स्वीकारता आमचं नाव घेण्यासाठी प्रयत्न केला गेला. दिवसभर माझ्यावर आरोप, रास्तारोको केला गेला आणि याला जातीय रंग दिला गेला. जातीय दंगल पेटवण्याचा प्रयत्न केल्याचे आरोप केले गेले. पोलीस अधीक्षकांनी सौरव सोनवणेचा या प्रकरणात संबंध नाही हे सांगीतले.
केजच्या नगराध्यक्षासह सगळे नेते माझ्यावर आरोप करत होते. आरोप करणाऱ्यांना मी ओळखतही नाही. कट रचून माझ्यावर आरोप केले त्या सर्व बारा- तेरा जणांवर प्रत्येकी पाचशे कोटींचा अब्रूनुकसानीचा दावा मी ठोकणार आहे, असे सोनवणे यांनी सांगीतले. सुमंत धस, संजय केदार, भगवान केदार माझ्याविरोधात बोलले. माझ्यावर जातीवादाचा आरोप केला गेला. पण तुमच्याच गावातील काही लोकांना यात जातीयवाद दिसला नाही. मग हे काही लोकांनी ठरवून केले, असा आरोप बजरंग सोनवणे यांनी केला.
खोटी अॅट्राॅसिटी का केली?
मी विलास घुले, उमेश माने यांना ओळखत नाही, रमेश घुलेला ओळखतो. उमेश मानेला मारायला आले होते, मग माझ्या मुलाचा काय संबंध? विलास-रमेश हे भाऊ सहा महिन्यापासून एकमेकांशी बोलत नव्हते. महिलेवर झालेल्या अत्याचारातून हे प्रकरण घडले. आमच्यावर खोटी अॅट्रासिटी दाखल करायला लावली. आमच्यावर अॅट्रासिटी करणाऱ्यांनी उमेश माने याच्याकडे कोणत्या समाजाचे प्रमाणपत्र आहे? हा डीवायएसपी, एसपींना खासदार म्हणून माझा प्रश्न आहे.
एसपीसाहेबांनी रात्रीपर्यंत सौरव सोनवणेचे नाव नाही असे सांगीतले. पण त्यानंतर कोणाचा दबाव आला म्हणून तुम्ही पुरवणी जबाबात माझ्या मुलाचे नाव घेतले? याचे उत्तर एसपींना द्यावे लागेल. हा कट रचला गेला, मी या घटनेतील एक आरोपी मंगेश कदम सोडला तर इतर कोणालाही ओळखत नाही, असेही बजरंग सोनवणे यांनी स्पष्ट केले.
आॅडिओ क्लीपमधील संभाषण वाल्मीक कराड आणि सुग्रीव कराड यांच्यातील आहे. हा कट कोणी रचला? एसपीसाहेबांना मी हे सगळं सांगणार आहे. सुग्रीव कराड हा कर्नाटकमध्ये वाॅटेंड आहे. वाल्मीक आणि सुग्रीव कराड, रमेश घुले याच्यावर गुन्हा दाखल करा, अशी मागणीही बजरंग सोनवणे यांनी केली.
परळीचा आमदार ढोंगी..
कारागृह अधीक्षकावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. वाल्मीक कराड एका गुन्ह्यात आरोपी आहे. पहिली घटना घडली तेव्हापासून माझा मुलगा इथेच आहे, त्याचा फोन बंद नव्हता. आम्ही दोषी नव्हतो म्हणून पळालो नाही. तुम्ही मात्र संतोष देशमुख हत्येनंतर पळून गेला होता, असा टोलाही सोनवणे यांनी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना नाव न घेता लगावला. परळीचा आमदार ढोंगी आहे, असेही ते म्हणाले. जेलमधून वाल्मीक कट रचतो हे सिद्ध झाले. ही आॅडिओ फाॅरेन्सीकला पाठवा, आवाज कोणाचा आहे ते तपासा, असे थेट आव्हानच सोनवणे यांनी दिले.
या विषयावर माझी ही शेवटची प्रेस आहे. यानंतर कोणी पुन्हा माझ्या नादाला लागले तर मी व्हिडिओसह तुमचं सगळं बाहेर काढणार, नाहीतर राजकारणातून एक्झीट घेईल, असा इशाराही सोनवणे यांनी दिला. धनंजय मुंडेंवर माझ प्रेम होतं, त्याच्यासाठी मी रडलोयं. त्याच्या आमदारकीसाठी गोपीनाथ मुंडेंचे मी पाय धरले होते. आता पुन्हा मला डिवचलं तर तुमचं सगळ बाहेर काढणार नाही तर राजकारणातून एक्झीट घेणार, याचा पुनरुच्चार बजरंग सोनवणे यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.