Raosaheb Danve sarkarnama
महाराष्ट्र

Raosaheb Danve In Vidhansabha : सलग पाचवेळा खासदार असलेल्या रावसाहेब दानवेंना पुन्हा विधानसभा खुणावतेय का?

Tushar Patil

जालना : 29 फेब्रुवारी | गावचे सरपंच ते पाचवेळा सलग खासदार, दोनदा केंद्रात राज्यमंत्री झालेल्या रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) यांनी नुकतीच मुंबईच्या विधीमंडळाला भेट दिली. महाराष्ट्र विधानसभेचे सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अशावेळी रावसाहेब दानवे यांनी बुधवारी ( 28 फेब्रुवारी ) विधीमंडळात येत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह भाजप व इतर पक्षातील मंत्री, आमदारांच्या भेटी घेतल्या. दानवेंचा विधीमंडळ आणि परिसरातील वावर त्यांना भुतकाळात घेऊन गेला आणि आपल्या आमदार पदाच्या काळातील आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाल्याची उत्स्फूर्त प्रतिक्रिया दानवे यांनी व्यक्त केली.

गावच्या सरपंच पदापासून आपल्या राजकारणाचा श्रीगणेशा केलेले रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve ) दोनवेळा आमदार आणि सलग पाचवेळा जालना लोकसभा मतदारसंघातून ( Jalna Lok sabha Constituency ) निवडून गेले आहेत. कुठल्याही नेत्याचं पहिले प्रेम हे आपल्या राज्यावर असते, तसे दानवेंचीही आहे. महाराष्ट्रात प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द सर्वात यशस्वी म्हणून ओळखली जाते. त्यांच्याच कार्यकाळात राज्यात भाजपने ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवले होते. प्रदेशाध्यक्ष म्हणून दानवे यांनाही त्याचे श्रेय दिले गेले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...अन् पाचवेळा दावने जालन्यातून निवडून आले

पण, भाजपमध्ये राष्ट्रप्रथम हा मंत्र सर्वांना लागू होतो. त्यामुळे इच्छा असो किंवा नसो, पक्षादेश आला की मिळेल ती जबाबदारी पार पाडावी लागते. त्याचप्रमाणे दोनवेळा आमदार राहिलेल्या दानवेंना 1999 मध्ये जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आदेश झाला आणि त्यांनी तो मान्य केला. तेव्हापासून सलग पाच टर्म म्हणजे पंचवीस वर्ष दानवे हे जालना लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे सहाजिकच बुधवारी ते विधीमंडळात आले तेव्हा, अनेकांनी रावसाहेब दानवे यांना पुन्हा विधानसभा खुणावतेय का? अशी मिश्किल टिप्पणी केली.

महाजनांनी दानवेंना जालन्यातून लढायला लावलं

केंद्रात मंत्री असलेली व्यक्ती विधीमंडळात फारशी दिसत नाही. पण, दानवे त्याला अपवाद ठरतात. यापूर्वीही दानवेंनी विधीमंडळ अधिवेशनावेळी भेट देऊन जुना काळ अनुभवला होता. दिवंगत भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी 1999 मध्ये दानवेंना जालन्यातून लोकसभा लढवण्यास सांगितले आणि तेव्हापासून ते दिल्लीच्या राजकारणात कार्यरत आहेत.

दानवेंच्या रूपाने मराठवाड्याला रेल्वेमंत्रालय खाते

दिल्लीत मन रमत नसले, तरी दानवेंनी प्रथम राष्ट्र या मंत्राला प्राधान्य देत मिळालेल्या खात्याची जबाबदारी चोखपणे पार पाडली. दानवेंच्या रुपानेच मराठवाड्याला पहिल्यांदा रेल्वे मंत्रालयासारेख महत्वाचे खाते मिळाले. त्याचा फायदा महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील रखडलेल्या रेल्वे विकासकामांना रुळावर आणण्यात झाला.

दानवेंनी संपूर्ण राज्यात दौरा केला

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात ते सलग दुसऱ्यांदा मंत्री म्हणून कार्यरत आहेत. 2014 -2019 दरम्यान रावसाहेब दानवे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षही होते. आपल्या ग्रामीण शैली आणि बोलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या दानवे यांनी या काळात संपूर्ण राज्य पालथे घातले आणि भाजपला नंबर एकचा पक्ष बनवण्यात मोठा वाटा उचलला. कार्यकर्त्यांबरोबर शेतात डब्बा पार्टीची मूळ संकल्पना रावसाहेब दानवे यांचीच होती. पुढे ती देशपातळीवर राबवली गेली.

दानवेंना राज्यात मोठी जबाबदारी?

भाजपच्या स्थापनेपासून पक्षामध्ये काम करणारे महाराष्ट्रातील जुन्या अनुभवी नेत्यांमध्ये नितीन गडकरी व रावसाहेब दानवे या दोघांचा समावेश होतो. भाजपने गेल्या दहा वर्षात राज्यात अनेक धक्के दिले आहेत. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर रावसाहेब दानवे यांना राज्यात मोठी जबाबदारी मिळते का? याची चर्चाही दानवेंच्या विधीमंडळ भेटीच्या पार्श्वभूमीवर होताना दिसत आहे.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT