Bhimrao Dhonde
Bhimrao Dhonde  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Bhimrao Dhonde : 69 वर्षांचे माजी आमदार भीमराव धोंडे 'हनीट्रॅप'च्या जाळ्यात? मागितली एक कोटीची खंडणी...

Pradeep Pendhare

Ahmednagar Crime News : माजी आमदार भीमराव धोंडे यांना तुमचा अश्लील व्हिडिओ आमच्याकडे आहे, असे धमकावत त्यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली. यूट्यूबवरील नगरमधील एका चॅनल चालक आणि त्याच्या दोन महिला सहकाऱ्यांविरोधात याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिलेल्या फिर्यादी दिली आहे. इस्माईल दर्यानी ऊर्फ भैय्या बाॅक्सर (रा. नगर) आणि त्याच्याबरोबर असलेल्या एका महिला सहकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. 'हनीट्रॅप'चा हा प्रकार असल्याचा संशय पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी व्यक्त केला.

वय वर्षे 69 असलेले माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कोतवाली पोलिस (Police) ठाण्यात मध्यरात्रीनंतर येत कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांची भेट घेतली. घडलेल्या घटनाक्रम सांगून तक्रार दिली. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदवला. भीमराव धोंडे यांच्या फिर्यादीवरून इस्माईल दर्यानी ऊर्फ भैय्या बाॅक्सर (रा. नगर) याच्यासह त्याच्या दोन महिला सहकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जानेवारी 2024 ते 26 जून 2024 पर्यंत वेळोवेळी संपर्क साधून इस्माईल दर्यानी ऊर्फ भैय्या बाॅक्सर आणि त्याच्या दोन महिला सहकाऱ्यांनी धमकावत वेठीस धरल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

नगर शहरातील स्टेट बँक चौकातील एका हाॅटेलमध्ये या तिघांनी वेळोवेळी कोणत्या-कोणत्या माध्यमातून संपर्क साधून तुमचे आमच्याकडे अश्लील व्हिडिओ आहेत. ते सोशल मीडियावर प्रसारीत करू. बलात्काराचा गुन्हा दाखल करू. तुमचे राजकीय कारकीर्द संपवून टाकू, अशी धमकी देत एक कोटी रुपयांची मागणी खंडणीखोरांनी भीमराव धोंडे यांच्याकडे वारंवार केली. या मागणीपोटी स्वीय सहायक जफर शेख यांच्याकडून 25 हजार रुपये देखील घेतल्याचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. हे पैसे कधी, कोठे आणि कसे घेतले, याची माहिती देखील फिर्यादीने पोलिसांना दिली आहे.

कोतवाली पोलिसांनी माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या फिर्यादीनुसार इस्माईल दर्यानी ऊर्फ भैय्या बाॅक्सर आणि त्याच्या दोन महिला सहकाऱ्यांविरोधात संगनमताने खंडणी मागणे, खंडणीसाठी धमकावणे आणि खोट्या आरोपांची भीती दाखवणे या कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. माजी आमदार भीमराव धोंडे यांच्याबरोबर खंडणीचा झालेला हा प्रकार हनीट्रॅपचा भाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानुसार तपास होईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली. या गुन्ह्यात दोघांना अटक केली आहे. इस्माईल दर्यानी ऊर्फ भैय्या बाॅक्सर आणि त्याच्याबरोबर असलेल्या महिला सहकाऱ्याला अटक केली आहे. आणखी काही माहिती असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन कोतवाली पोलिसांनी केले आहे. सहायक निरीक्षक योगिता कोकाटे गुन्ह्याचा तपास करत आहेत.

भीमराम धोंडे कोण आहेत

69 वर्षीय भीमराव धोंडे आष्टी मतदारसंघाचे माजी आमदार आहेत. चार टर्म त्यांनी आष्टी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. पहिल्यांदा 1980 ते 1985 ते अपक्ष निवडून आले होते. त्यानंतर 1985 ते 1990 आणि 1990 ते 1995 काँग्रेसचे आमदार होते. आष्टी तालुक्यात शिक्षणसम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. तसेच तालुक्यातील कडा सहकारी साखर कारखाना (सध्याचा महेश साखर कारखाना) हा भीमराव धोंडे यांच्या अधिपत्याखालीच कायम राहिलेला आहे.

आष्टी तालुक्यात त्यांच्या जवळपास 40 च्या वर शिक्षण संस्था आहेत. त्यात प्राथमिक, माध्यमिक शाळा-महाविद्यालय, कृषि, बीएचएमएस काॅलेज यांचा समावेश आहे. 2009 मध्ये त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. 2014 मध्ये भाजपमध्ये प्रवेश करून ते पुन्हा आमदार झाले. 2019 मध्ये त्यांचा राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे यांनी पराभव केला. आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी धोंडे इच्छुक असून भाजपकडून ते प्रबळ दावेदार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT