Farmer : सध्या कांद्याच्या आणि कापसाच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे. त्यामुळे कांदा आणि कापूस उत्पादक शेतकरी संकटात आहे. मालाला भाव मिळावा यासाठी शेतकरी ठिक-ठिकाणी आंदोलनही करत आहेत.
शेतमालाला खर्चापेक्षा निम्मी किंमत देखील मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. अनेक ठिकाणी तर शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर रोटर फिरवल्याचेही पाहायला मिळाले.
याच पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्ह्यातील एका तरुणाने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं आहे. या तरुणाने आता उभ्या पिकांवर रोटर फिरवण्यासाठी तरी अनुदान द्या, अशी मागणी राष्ट्रपती यांच्याकडे केली आहे. शुभम वाघ असं या तरुणाचे नाव असून तो जामखेड तालुक्यातील रहिवाशी आहे.
तरुणाने पत्रात नेमकं काय म्हटलं?
''शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली आहे. शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेतमालाला कवडीमोल दर मिळत आहे. त्यामुळे उभ्या पिकात रोटर फिरवण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजारात ५०० ते ६०० किलो कांदा विकून देखील फक्त दोन रुपयांची पट्टी हातात मिळत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आला आहे''.
''एवढंच नाही तर कोबी, फ्लॉवर, कांदा आणि केळीच्या बागेतवरही रोटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. महागाई वाढल्यामुळे शेतीसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतोय. तर दुसरीकडे खर्चाच्या निम्मी रक्कम देखील शेतकऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती करावी की नाही? हा मोठा उपस्थित होत आहे''.
''कोणतेही पीक घेतले तरी तिच अवस्था आहे. पण त्यांच्याकडे दुसरा पर्याय आहे का? त्यामुळे माय-बाप सरकार तुम्हीच याकडे लक्ष द्या. शेतात साधा रोटर फिरवायचा म्हटलं तरी २००० ते २५०० रुपये खर्च येतो. तर आज पिकाला कवडीमोल दर मिळत आहे''.
''त्यामुळे उभ्या पिकात शेतकरी रोटर फिरवत आहे. शेतमाल विकला नाही, तर शेतकऱ्याला रोटर फिरवायलाही उसनवारी करावी लागत आहे. पण शेतीमालाला चांगला दर मिळाला तरी ही वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही''.
''शेतकऱ्यांना दोन रुपये एवढी कांद्याची पट्टी मिळत आहे. पण तोच कांदा बाजारात सर्वसामन्यांना २० रुपये किलोने विकला जातो. मग शेतकऱ्यांची कोंडी आणि कोणाची चांदी होत नाही का? शेतकरी राजाने फक्त कष्टच करायचं का? शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, पण आज या पोशिंद्यावरच काय वेळ आली आहे''.
''लेकरांच्या तोंडाचा घास घेऊन उसनवारी करून पीक जोमात आणले. पण आता त्यालाच कवडीचा दर मिळत आहे. त्यामुळे भाव नसलेल्या पिकात रोटर फिरवण्यासाठी जगाच्या पोशिंद्याला किमान प्रति एकर दोन हजार रुपयांचं अनुदान तरी द्या, ही कळकळीची विनंती'', असं पत्र या तरूणाने लिहिलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.