Abdul Sattar
Abdul Sattar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Abdul Sattar News: अब्दुल सत्तार यांच्यापुढे तरुण म्हणाले, `पन्नास खोके, एकदम ओके`

Sampat Devgire

Nashik News: निफाड (Niphad) तालुक्यात शनिवारी वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे द्राक्ष, कांदा, गहू व मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी मंगळवारी पाहणी केली. नुकसानीचे मला गांभीर्य असून, मुख्यमंत्र्यांसमोर (Eknath Shinde) परिस्थिती मांडणार असल्याचे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले. दरम्यान, कृषिमंत्र्यांनी धावता दौरा केल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. (Farmers Angry on Abdul Sattar`s non serious visits)

गेल्या वर्षीची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळालेली नाही. त्याची चौकशी करा. फक्त पंचनामे करून कागदी घोडे नाचवू नका, तर आम्हाला दिलासा द्या. असा संतप्त सूर कृषिमंत्री सत्तार यांच्या शेतकऱ्यांशी झालेल्या चर्चेत पाहायला मिळाला. पाहणी करायला आलेल्या कृषिमंत्र्यांसमोरच काही तरुणांनी `पन्नास खोके, एकदम ओके` या घोषणा दिल्याने तो चर्चेचा विषय ठरला.

निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या घरासमोर झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी आपली हातबलता कृषिमंत्र्यांसमोर मांडली. राज्य सरकारने द्राक्ष पिकांना क्रॉप कव्हरसाठी अनुदान दिले असते, तर ही नुकसानीची वेळ आली नसती, अशी रोखठोक भूमिका शेतकऱ्यांनी मांडली.

यावेळी कृषीमंत्र्यांसमोर जिल्हा बँकेची वसुली, विजेचे भारनियमन, बँकांची वसुली यासह व्यापाऱ्यांकडून होणारी लूट असे अनेक मुद्दे उपस्थित करण्यात आले. निफाड उपविभागीय अधिकारी डॉ. अर्चना पठारे, तहसीलदार शरद घोरपडे, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब घागरे यांच्यासह शिवसेनेचे भाऊलाल तांबडे, प्रकाश पाटील, द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष कैलास भोसले व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ग्रामस्थांनी विविध मागण्यांची निवेदने कृषिमंत्र्यांना दिली. आमच्या समस्या जाणून घेत आम्हाला ठोस शब्द द्या, अशी भूमिका शेतकऱ्यांनी यावेळी मांडली. त्यावर कृषिमंत्री म्हणाले, अधिवेशन सुरू असल्याने तूर्तास काही आश्‍वासन देता येणार नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ती मांडली जाईल. राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

शेतकऱ्यांनी व्यक्त केला संताप

कृषिमंत्री मुळातच तब्बल तीन तास उशिरा आले. तेही टायर रोडने आले अन्‌ टायर रोडनेच गेले. शेतकऱ्यांच्या कुठल्याही व्यथा मनापासून समजून घेण्यापेक्षा ते एकटेच बोलत राहिले. कुठल्याही समस्येचा निराकरण त्यांनी केले नाही, तसेच कुठलेही आश्‍वासनही न देता, शेतकऱ्यांचा आवाजच दाबला.

आम्ही सहा महिन्यात काय केलं, मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय घेतले हेच सांगत बसले. पण, शेतकऱ्याला काय मिळालं? कृषिमंत्र्यांना पाहणी दौरा करायचा होता, तर त्यांनी दिवसा यायला हवे होते. महत्त्वाचे म्हणजे त्यांनी द्राक्ष, कांदा अशा सर्वच पिकांची पाहणी करायला हवी होती. मात्र, ते इतर पिकांचे नुकसान न पाहताच निघून गेले. मी कसा प्रवास केला? मला कशा प्रवासात अडचणी झाल्या? हेच सांगत बसले. शेतकऱ्यांची व्यथा मनापासून का ऐकून घेतली नाही? असा संताप सवालही शेतकऱ्यांनी या वेळी विचारला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT