Aditya Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Aditya Thackeray : भाजपच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरेंची जोरदार बॅटिंग; म्हणाले, 'मंत्रालय गुजरातला...'

Maharashtra Politics : आदित्य ठाकरे यांनी जळगावचा दौरा केल्याने ठाकरे गटाचा या मतदारसंघावर दावा तर नाही ना ? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत.

संपत देवगिरे : सरकारनामा

Nashik News: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी थेट भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले आहे. येणारी निवडणूक महाराष्ट्र आणि मराठी या भावनिक विषयांकडे नेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या या दौऱ्यात मोठा प्रतिसाद मिळाला.

अन्य राजकीय पक्ष आगामी निवडणुकीबाबत धोरण आणि उमेदवार या दोन्हीबाबत चाचपडताना दिसतात. अगदी भारतीय जनता पक्षात देखील अशीच गोंधळाची स्थिती आहे. असे असताना आदित्य ठाकरेंनी गुरुवारी थेट जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी चाचपणी केली. त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून जळगाव मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार कोण ? याची चर्चा घडविण्यात ठाकरे यांचा दौरा यशस्वी झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय जनता पक्षाच्या बालेकिल्ल्यात जाऊन आदित्य ठाकरे यांनी हा भाजप आणि त्याच्या नेत्यांना थेट आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. शिवसेनेचे येथील सर्व आमदार बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटात गेले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजपचे मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) मंत्री अनिल पाटील यांना आव्हान देण्याचा हा प्रयत्न होता.

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेस हे दोन प्रमुख घटक मतदारसंघाचे दावेदार आहेत. अशा स्थितीत ठाकरे यांनी दौरा केल्याने शिवसेनेचा या मतदारसंघावर दावा तर नाही ना ? याची देखील चर्चा यावेळी झाली.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, 'सध्याचे भाजपचे सरकार पुन्हा येऊ देऊ नका. हे सरकार पुन्हा आल्यास राज्यातील मंत्रालय देखील गुजरातला जाईल. देशाचे संविधान देखील बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विविध घटनावरून ते दिसून आले आहे. अशावेळी मतदारांनीच सावध आणि चाणाक्ष झाले पाहिजे. राज्यातील अनेक उद्योग, संस्था गुजरातला पळवून नेल्या आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत जात-पात धर्म बाजूला ठेवून फक्त महाराष्ट्र धर्म म्हणूनच मतदान करा'.

जळगावच्या या संबंध दौऱ्यात ठाकरे यांनी आगामी निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्ष पराभूत होईल. महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार येईल, हा मुद्दा कार्यकर्त्यांवर बिंबविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. ठाकरे यांचे अतिशय उत्साहात स्वागत झाले.

या निमित्ताने महाविकास आघाडीचे विविध घटक पक्ष देखील सहभागी झाल्याचे दिसले. माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, संपर्कप्रमुख संजय सावंत, शरद तायडे, जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांचं अनेक पदाधिकारी या दौऱ्यात सहभागी झाले होते.

Edited By-Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT