pankaj Bhujbal Chhagan Bhujbal sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik News : भुजबळांनंतर मुलालाही मराठा समाजाच्या रोषाला जावं लागलं सामोरे; ताफा अडविण्याचा प्रयत्न अन्...

Sampat Devgire

Nandgaon Constituency News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांना त्यांच्या येवला मतदारसंघात मराठा आंदोलनाची झळ बसली होती. गुरुवारी ( 22 फेब्रुवारी ) भुजबळांचे चिरंजीव पंकज भुजबळ ( Pankaj Bhujbal ) यांनाही नांदगाव मतदारसंघात मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

माजी आमदार असलेले पंकज भुजबळ गुरुवारी नांदगाव विधानसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर गेले होते. या मतदारसंघाचा काही भाग मालेगाव तालुक्यात समाविष्ट आहे. या भागातील मांजरे, कौळाणे, नगाव, टाकळी, वराने आदी गावांत पंकज भुजबळ यांचा दौरा होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या दौऱ्याची सुरुवात होताच नगाव येथे त्यांना मराठा आरक्षण आंदोलनाच्या समर्थकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. या वेळी त्यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न झाला. कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोषणा देत पंकज भुजबळांचा निषेध केल्याने काहीसा गोंधळ झाला. शेवटी भुजबळ तेथून परत निघून गेले.

या वेळी सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी "मराठा आरक्षणाचा प्रश्न समाधानकारक सुटत नाही, तोपर्यंत आम्ही कोणत्याही राजकीय नेत्याला मतदारसंघात फिरू देणार नाही. ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्यं केलेली आहेत. समाजाचा अवमान करण्याचा त्यांचा हेतू होता. त्यामुळे जोपर्यंत ते मराठा समाजाची माफी मागत नाहीत, तोपर्यंत आम्ही त्यांना मतदारसंघात दौरा करू देणार नाही. ही आमची अतिशय स्पष्ट भूमिका आहे. त्यात कधीही तडजोड होणार नाही."

एकंदरीत भुजबळ आणि मराठा आंदोलक यांच्यातील संघर्ष कमी होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. यापूर्वी छगन भुजबळ अवकाळी पावसाची पाहणी करण्यासाठी येवला मतदारसंघात गेले असता, त्यांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर बरेच दिवस हे राजकारण तापलेले दिसले. मराठा आरक्षणाचा निर्णय विधिमंडळाच्या अधिवेशनात झालेला आहे. त्यानंतर माजी आमदार पंकज भुजबळांना झालेला विरोध पाहता शासनाने मराठा आरक्षणाबाबत घेतलेला निर्णय समाजाचे समाधान करणारा दिसत नाही. त्यातून भुजबळ विरुद्ध मराठा आरक्षणाचे समर्थक असा संघर्ष आणखी किती दिवस चालतो, याची उत्कंठा राजकीय कार्यकर्त्यांना लागून राहिलेली आहे.

यासंदर्भात माजी आमदार पंकज भुजबळ यांच्याशी संपर्क केला. तेव्हा, "आपला दौरा सुरळीत झाला. कोणताही विरोध झालेला नाही," असा दावा पंकज भुजबळांनी केला.

( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT