Manikrao Kokate Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Manikrao Kokate : कृषीमंत्री नाशिकचेच, ते पुसतील का शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू?

Agriculture Minister Manikrao Kokate : नुकसानग्रस्त शेतकऱ्याला किमान प्रति एकर दीड लाख रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.

Ganesh Sonawane

Nashik News : सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटमुळे नाशिक जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. बुधवार (दि. 2) झालेल्या अवकाळी पावसामुळे एक हजार 298 हेक्टर शेती पिकाला तडाखा बसल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे.

उन्हाळ कांदा, द्राक्षबागांसह डाळिंब, भाजीपाला व टोमॅटोचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना मदतीची आर्त साद घातली आहे. ते जिल्ह्यातील नुकसानीची आज पाहणी देखील करणार आहेत.

अपेक्षित भाव मिळत नसल्याने अगोदरच संकटात असलेल्या नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे अचानक झालेल्या अवकाळी व गारपीटमुळे पुन्हा नवे संकट उभे ठाकले आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या कांद्याला फटका बसला आहे. मुसळधार पावसामुळे व गारपीटमुळे अनेक ठिकाणी कांद्याच्या पाती गळून पडल्या आहेत. त्यातून कांद्याची साठवणूक क्षमता कमी होऊन उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे.

नैसर्गिक आपत्ती आली की शेतकऱ्यांना सरकारकडून तुटपुंजी मदत मिळते. कांद्याची शेती वाढावी व देशात मुबलक प्रमाणात कांदा उपलब्ध व्हावा असे जर सरकारला वाटत असेल तर सरकारने कांदा उत्पादकांना परिपूर्ण मदत वेळोवेळी केली पाहीजे. अवकाळी पाऊस व गारपीटमुळे जिल्ह्यात जिथे जिथे नुकसान झाले आहे, त्या भागाचा तातडीने कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी दौरा करावा ते नाशिकचेच असल्याने त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत. शेतकऱ्याला किमान प्रति एकर दीड लाख रुपयांची भरपाई द्यावी अशी मागणी राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी केली आहे.

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज (दि.4) नुकसानीची पाहणी करणार आहेत. ते पंचनामे करण्याचे आदेश देतील. थोडीफार मदतही करतील पण त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित मदत देऊन कांदा उत्पादकांचे अश्रू पुसावे अशी मागणी कांदा उत्पादकांनी केली आहे.

बागलाण तालुक्यात अधिक नुकसान

गारपीटसह मुसळधारेमुळे बागलाण तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील 30 गावांमधील एक हजार 990 शेतकऱ्यांना या पावसाचा फटका बसला आहे. बागलाणमध्ये एक हजार 155 हेक्टर, कळवणला 75 हेक्टर, दिंडोरी 15 हेक्टर तर नाशिक तालुक्यात 42.60 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT