
Maharashtra Politics Update : कृषिमंत्री झाल्यापासून माणिकराव कोकाटे हे कायमच कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत राहिले आहेत. कृषिमंत्रीपदासोबतच नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. मात्र, गेल्या दोन महिन्याहुन अधिक काळापासून नंदुबार जिल्ह्यात त्यांचा एकही दौरा झाला नाही. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हरवले आहे, अशी जोरदार चर्चा सध्या जिल्ह्यात सुरु आहे.
माणिकराव कोकाटे हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. अजित पवार यांचे ते जवळचे व विश्वासू सहकारी असल्याने त्यांना राज्यातील कृषी सारखे महत्वाचे खाते देण्यात आले आहे. त्याशिवाय नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांच्याकडे आहे. मात्र कोकाटेंनी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाल्यानंतर आढावा घेण्यासाठी जिल्ह्याचा दौरा अद्याप केलेला नाही. त्यामुळे पालकमंत्रीच जिल्ह्यात येत नसल्याने जिल्हा पोरका झाला का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पालकमंत्री झाल्यानंतर माणिकराव कोकाटे हे केवळ 26 जानेवारीला ध्वजारोहणासाठी नंदुरबार मध्ये आले होते. त्याला आता दोन महिन्यांपेक्षाही अधिकच काळ उलटला आहे. तरी देखील पालकमंत्री कोकाटे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले नाहीत. त्यामुळे नंदुरबार मधील जनतेची नाराजी स्वाभाविक असल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान नंदुरबार जिल्ह्यातील अनेक भागात गारपीट व अवकाळीमुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात कांदा, मका यासह अन्य पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे किमान आता तरी नुकसानीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री नंदुरबारमध्ये येतील का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्रीच राज्याचे कृषिमंत्री असल्याने ते आपल्याला अधिक चांगला न्याय देतील अशी आशा शेतकऱ्यांना आहे.
नंदुरबार हा आदिवासीबहुल जिल्हा असून येथील लोकसभा व विधानसभा मतदार संघ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आदिवासी मतदार संघ आहेत. १ जुलै १९९८ रोजी धुळे जिल्ह्यातून बाहेर पडून नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली. हा जिल्हा महाराष्ट्र व गुजरात व मध्यप्रदेश राज्याच्या सीमेजवळ असून याचे क्षेत्रफळ ५०३५ चौरस कि.मी. आहे. नाशिकपासून नंदुरबार २०० किलोमीटर अंतरावर आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.