Nilesh Lanke hunger strike  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke hunger strike : अहिल्यानगरमध्ये 2657 शिक्षक पदे रिक्त; 50 हजार विद्यार्थ्यांसाठी खासदार लंके यांचे बेमुदत उपोषण

Nilesh Lanke begins hunger strike over 2,657 vacant teacher posts in Ahilyanagar : जिल्हा परिषदेच्या शाळांतील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी; शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून मुक्त करण्याचीही मागणी, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा लंके यांचा निर्धार

Pradeep Pendhare

Ahilyanagar Zilla Parishad schools : अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील रिक्त शिक्षकांच्या पदभरतीविरोधात आंदोलन छेडले आहे. जिल्हा परिषदेच्या आवारात आजपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत.

50 हजार विद्यार्थ्यांचे नुकसान थांबवण्यासाठी ही शिक्षक भरतीवर कार्यवाही होईपर्यंत, आंदोलन सुरू राहणार असल्याचा ठाम निर्धार खासदार लंके यांनी केला आहे. खासदार लंकेंच्या या निर्धारामुळे जिल्हा परिषद प्रशासनाची धावपळ उडाली असून, मागण्यांबाबत प्रशासकीय पातळीवर काय कार्यवाही होते याकडे आता लक्ष लागले आहे.

अहिल्यानगर जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांची हजारो पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप करत खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी जिल्हा परिषदेच्या आवारात उपोषण सुरू केले आहे.

जिल्हा परिषदेच्या अधिकृत आकडेवारीनुसार, प्राथमिक व पदवीधर शिक्षक संवर्गातील 471, माध्यमिक विभागातील 2054, तर प्राथमिक विभागातील मुख्याध्यापकांची 132 पदे रिक्त आहेत. म्हणजेच जिल्ह्यात एकूण 2657 पदे रिक्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. एका शिक्षकामागे (Teacher) 20 विद्यार्थी गृहीत धरल्यास या रिक्त पदांचा थेट परिणाम 50 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याचे खासदार लंके यांनी म्हटले आहे.

एकीकडे शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असताना, दुसरीकडे कार्यरत शिक्षकांवर बीएलओ ड्युटी, मतदार यादी पुनरीक्षण, जनगणना, विविध सरकारी सर्वेक्षणाची, ऑनलाइन पोर्टलवर माहिती भरणे, आधार कार्ड व बँक खाते नोंदी, पोषण आहार आणि आरोग्य नोंदी यांसारख्या अशैक्षणिक कामांचा अतिरिक्त भार टाकला जात असल्याचा आरोप खासदार लंके यांनी केला.

या अशैक्षणिक कामांमुळे शिक्षकांचा अध्यापनाचा महत्त्वाचा वेळ कागदोपत्री कामांमध्ये जात असून, त्याचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर विपरीत परिणाम होत असल्याचे खासदार लंके यांनी म्हटले. जिल्ह्यातील सर्व रिक्त शिक्षक पदे तातडीने भरण्यात यावीत, त्यासाठी मुदतीसह कालबद्ध कृती आराखडा आणि शाळानिहाय अंतिम यादी जाहीर करावी, तसेच शिक्षकांना अशैक्षणिक कामांतून पूर्णपणे मुक्त करावे, या प्रमुख मागण्या खासदार लंके यांनी आपल्या आंदोलनात ठेवल्या आहेत. या मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच राहणार, असा इशारा खासदार लंके यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT