Ahilyanagar heavy rainfall action : अहिल्यानगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा मोठा फटका बसला असून, 124 पैकी 84 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या 3 हजार 497 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. स्थानिक नागरिक व शोध-बचाव पथकांच्या मदतीने 60 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली.
3 लाख 56 हजार शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका बसला. 2 लाख 53 हजार हेक्टरवरील शेती पिके बाधित झाली. 2068 विहिरी ढासळल्या. 599 घरांची पडझड झाली. 355 घरांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार चार जणांचा मृत्यू, तर चार जण जखमी झाले. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिवृष्टीवर उपाययोजनांचा आढावा घेताना, ओढे-नाल्यावर अतिक्रमणांवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या.
अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यात तसेच जायकवाडी धरण क्षेत्रात शनिवारी रात्रभर पाऊस झाला. अतिवृष्टीचा (Flood) अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना फटका बसला. अहिल्यानगर शहरातील नालेगाव परिसरात सीना नदीचे पाणी घुसले. या अतिवृष्टीने बाधित झालेल्यांना दिलासा देण्यासाठी सर्वच पक्षाचे लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी फिल्डवर होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अॅक्शन मोडवर होते. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर जिल्हा प्रशासनाची बैठक घेत, अतिवृष्टी उपाययोजनांवर तातडीची आढावा बैठक घेतली.
'अहिल्यानगर जिल्ह्यातील ओढे-नाले, चाऱ्या, तलाव, कालवे, बंधारे, रस्ते व पूल यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. यामुळे पाण्याला अटकाव होऊन पूर परिस्थिती निर्माण होते. हे अतिक्रमण तात्काळ काढण्यासाठी युद्ध पातळीवर मोहीम राबवा,' असे निर्देश पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) यांनी दिले.
'जलसंपदा व जलसंधारण विभागाने जिल्ह्यातील पाणीसाठ्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी समन्वयातून कृती आराखडा तयार करावा. ओढे-नाले व चराई क्षेत्रांची व्यवस्थित मोजमाप करून अतिक्रमण हटविण्यात यावे,' अशा सूचना पालकमंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
पाथर्डी व शेवगाव या दोन्ही तालुक्यांमध्ये मिळून अंदाजे 1 लाख हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. जामखेड तालुक्यात 60 हेक्टर क्षेत्र व राहाता तालुक्यात अंदाजे 40 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. जिल्हा प्रशासन सतर्क असल्याने मनुष्यहानी कमी झाली आहे. प्रशासनाच्या तत्परतेमुळे हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले आहे.
जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, साई आश्रम अशा ठिकाणी पुरग्रस्तांना तात्पुरता निवारा देण्यात आला आहे. प्रशासन, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून पुरग्रस्तांना सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पुरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर लक्ष ठेवण्याचे काम प्रशासनाने करावे, अशा सूचनाही मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.
महावितरणच्या वीज वितरण पेट्या पाण्यात गेल्या, तरी वीजपुरवठा खंडित करण्यात आला नाही. मात्र ट्रान्सफॉर्मर पाण्याच्या प्रवाहात येत असतील, तर तात्काळ वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करावी. कृषी व महसूल विभागाने सरसकट पंचनामे करावेत, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी दिल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.