Maharashtra BJP updates : भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मंत्र चंदशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील भाजप संघटनेचे 58 जिल्हाध्यक्षांची नियुक्त झाली. संघटनेतील वाद ठिकाणच्या नियुक्ती अजून मागे ठेवल्या आहेत. अहिल्यानगर जिल्ह्यात संघटनेत जिल्ह्याच तीन जिल्हाध्यक्षपदात विभागणी करण्यात आली आहे.
नगर दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालसिंग, तर उत्तरच्या जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांची नियुक्ती झाली. नगर शहर जिल्हाध्यक्षपदावर तोडगा न निघल्याने तिथली नियुक्ती मागे ठेवण्यात आली आहे. मात्र दक्षिण आणि उत्तरच्या नियुक्तीवरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यातील सरकारबरोबरच पक्ष संघटनेवर मजबूत पकड ठेवली आहे.
नगर दक्षिणच्या जिल्हाध्यक्ष पदी दिलीप भालसिंग यांना पुन्हा संधी मिळाली आहे. भालसिंग हे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा आमदार शिवाजी कर्डिले यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मंत्री विखे पाटील आणि आमदार कर्डिले यांची राजकीय मैत्री जिल्ह्याला सर्वश्रुत आहे. भालसिंग यांच्या नियुक्ती करत मंत्री विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe) आमदार कर्डिले यांच्या वर्चस्वाला नगर दक्षिणेत बळ दिल्याचे दिसते.
दिलीप भालसिंग यांना भाजप (BJP) संघटनेत जिल्हाध्यक्षपदाच्या पूर्वीच्या कामाचा देखील अनुभव आहे. वरिष्ठांशी ते समन्वय साधून काम करताना बॅलन्स साधून होते. यातूनच त्यांनी वरिष्ठांची मर्जीतले झाले. नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी नेवाशातील नितीन दिनकर यांना संधी दिली. मंत्री विखे पाटील यांचे ते कट्टर समर्थक मानले जातात. मंत्री विखे पाटील यांनी दोन्ही ठिकाणी जिल्हाध्यक्षपदावर आपल्या समर्थकांना नियुक्ती करत, संघटनेवर पकड मजबूत केली आहे.
या दोन्ही ठिकाणी संघटनेतील निष्ठावान लोकांना डावलल्या गेल्याचा सूर आहे. नगर उत्तरमधून जालिंदर वाकचौरे, शिवाजी गोंदकर, राजेंद्र गोंदकर, नितीन कापसे, तर नगर दक्षिणेकडून अशोक खेडकर, बाळासाहेब महाडीक, युवराज पोटे हे इच्छुक होते. पण यांचा विचार देखील झाला नसल्याचा निष्ठावंतांमध्ये नाराजी आहे.
नगर शहर जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती मागे राहिली आहे. शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांच्यावर सध्या शहराचा पक्ष संघटनेचा कारभार आहे. विखे पिता-पुत्र या दोघांच्या मर्जीतील ज्येष्ठ स्थानिक नेत म्हणून अभय आगरकर यांची ओळख आहे. परंतु लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिणेतून भाजपचे सुजय विखे यांचा पराभव झाला. यानंतर नगर शहर भाजपमध्ये चांगलीच गटबाजी उफाळली. शहरात संघटनेत योग्य नियोजन झालं नसल्याचा आरोप संघटनेत झाला. अभय आगरकर यांना हटवण्यासाठी पक्षश्रेष्ठींपर्यंत तक्रारी झाल्या. तेव्हापासून नगर शहरातील पक्ष संघटनेत गटबाजी उफाळली आहे.
नगर शहर जिल्हाध्यक्षपदासाठी शहरातील विद्यमान शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र गंधे, सचिन पारखी, बाबा वाकळे, बाबासाहेब सानप, वसंत राठोड यांची नावे चर्चेत आहेत. आगामी महापालिका निवडणूक पाहता इथं समीकरण आखून नियुक्ती होईल. पण त्यावर देखील मंत्री विखे पाटलांचे वर्चस्व राहिल, असे सांगितले जात आहे. वर जे इच्छुक आहेत, त्यात महेंद्र गंधे, सचिन पारखी वगळता, विखे समर्थक अधिक आहेत. त्यामुळे इथं रस्सीखेच अधिक दिसणार. पण महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री विखे पाटील आणि त्याचे पुत्र सुजय विखेंचा अंतिम निर्णय इथं निर्णायक असेल, असे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.