Ahilyanagar politics : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अहिल्यानगरमध्ये देखील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महापालिकेच्या प्रभाग रचनेवरच्या हरकती, सूचनांवर सुनावणी झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.
अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आपल्या पदांचे सामूहिक राजीनामे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी प्रदेशाध्यक्ष तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना धाडले आहेत. सामूहिक राजीनामे देणारे हा काँग्रेसमधील पूर्वीचे अन् आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांना मानणारा गट असल्याचे काँग्रेसकडून सांगितले जात आहे.
ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मनोज गुंदेचा, अल्पसंख्यांक काँग्रेस (Congress) शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, महिला काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष उषा भगत, महिला काँग्रेस शहर जिल्हा उपाध्यक्ष शैला लांडे, काँग्रेस ग्रंथालय विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष सुनील आप्पा लांडगे आदींसह कार्यकर्त्यांचा राजीनामा देणाऱ्यांमध्ये समावेश आहे. यामुळे शहर काँग्रेसला खिंडार पडले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
सुत्रांकडून समजलेल्या माहितीनुसार, आज शनिवारी सायंकाळी पाच वाजता 'मातोश्री' इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत राजीनामे दिलेल्या पदाधिकाऱ्यांसह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते हाती शिवबंधन बांधणार आहे. शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्यासह अन्य शिवसेना नेत्यांची उपस्थिती असणार आहे.
शहरप्रमुख किरण काळे यांच्या पुढाकारातून हे प्रवेश होत आहेत. काळे काही महिन्यांपूर्वी काँग्रेसमधून बाहेर पडत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षात दाखल झाले होते. त्यानंतर काँग्रेसमध्ये रिक्त झालेल्या शहर जिल्हाध्यक्ष पदावर दीप चव्हाण यांची वर्णी लागली.
राजीनाम्यानंतर प्रतिक्रिया देताना मनोज गुंदेचा म्हणाले, "किरण काळे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष असताना गतप्राण झालेल्या काँग्रेसला काळे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये मागील पाच वर्षात आम्ही जीवाचं रान करून बळकट करण्याचं काम केलं. काळे यांनी काँग्रेसला नवसंजीवनी मिळवून दिली होती. मात्र ते सक्षम उमेदवार असून देखील विधानसभेला काँग्रेस पक्षाला ही जागा सोडवून घेत त्यांना उमेदवारी देता आली नाही. ते पक्षातून बाहेर पडल्यामुळे शहर काँग्रेस नेतृत्वहीन झाली आहे." माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबद्दल आमच्या मनामध्ये आजही अत्यंत आदराची भावना आहे. मात्र शहरामध्ये निर्भीड, आक्रमक आणि अभ्यासू नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळेच आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, काळे यांच्या खांद्याला खांदा लावून शिवसेनेत नव्या जोमाने काम करणार आहोत, असेही गुंदेचा यांनी म्हटले.
अनिस चुडीवाला यांनी सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाण्याची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाची भूमिका आहे. शहरातील गोरगरीब, सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, उद्योजक, महिला, जेष्ठ नागरिक, युवक अशा सगळ्याच घटकांना बरोबर घेऊन जाणाऱ्या शिवसेनेला आता किरण काळेंसारखे कणखर नेतृत्व मिळालेले आहे. त्यामुळे आम्ही काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.