Ahilyanagar DCC Bank election unopposed : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींवरून महायुतीमध्येच मतभेद असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी संगमनेर येथे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी खासदार सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विशेष म्हणजे, या बैठकीची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनाच नसल्याचा दावा राम शिंदे यांनी केला आहे.
जिल्हा बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेतल्यानंतर राम शिंदे यांनी या बैठकीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना विचारून ही बैठक झाली की, त्यांना न विचारता बैठक झाली, हा महत्त्वाचा प्रश्न असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले.
राम शिंदे (Ram Shinde) म्हणाले, पालकमंत्र्यांनी संगमनेरमधील बैठकीसंदर्भात बोलले पाहिजे. त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. बैठकीबाबत माहिती नाही, असे ते सांगत असतील, तर त्याचा अर्थ काय घ्यायचा? जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व, महायुतीचे पदाधिकारी आणि जिल्हा बँकेचे मतदार यांच्यासमोरही या बैठकीबाबत प्रश्न निर्माण झाले असल्याचे राम शिंदे यांनी सांगितले.
पालकमंत्र्यांची भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नसल्याचे सांगत राम शिंदे यांनी महायुतीतील अंतर्गत समन्वयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पालकमंत्री महायुतीमध्ये असूनही त्यांना बैठकीविषयी माहिती नाही, असे सांगत आहेत. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेकडून स्वतंत्र बैठक घेतली जात आहे. अशा परिस्थितीत सभापती म्हणून मला येथे भूमिका घ्यावी लागते की काय, असा प्रश्न मलाही पडला आहे, असे राम शिंदे म्हणाले.
जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांमध्ये एकसूत्रता असणे आवश्यक होते. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तशी एकजूट दिसत नसल्याचे राम शिंदे यांनी सूचित केले. त्यांच्या म्हणण्यानुसार, सर्वसमावेशक चर्चा करून एकत्रित निर्णय घेतला असता, तर सभासदांना स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज घेण्याची परिस्थिती निर्माण झाली नसती. मात्र, आता विविध नेत्यांकडून स्वतंत्र बैठका होत असल्याने बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
राम शिंदे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भूमिकेवर थेट सवाल उपस्थित केला. पालकमंत्र्यांनाच बैठकीची माहिती नसेल, तर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध कशी होणार? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राम शिंदे यांच्या या भूमिकेमुळे अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचालींना नवे वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः महायुतीतील घटक पक्ष आणि स्थानिक नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र निर्माण झाल्यास निवडणुकीतील समीकरणे बदलू शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.