Ahilyanagar DCC Bank Election : जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीत धुसफूस; शिंदे शिवसेनेची स्वतंत्र चाल, लढतीच्या संकेतात खताळ-लंघे बैठकीला गैरहजर

Eknath Shinde Sena signals a separate stand as talks for an unopposed Ahilyanagar district bank election face a new hurdle : बिनविरोध निवडणुकीच्या बैठकीत विश्वासात न घेतल्याने नाराजी; राम रेपाळेंच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेची बैठक, खताळ-लंघे गैरहजर
Eknath Shinde Shiv Sena
Eknath Shinde Shiv SenaSarkarnama
Published on: 
Updated on: 

Ahilyanagar District Central Cooperative Bank : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांच्या हालचाली सुरू असतानाच आता एकनाथ शिंदे शिवसेनेने स्वतंत्र भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.

बिनविरोध निवडणुकीसंदर्भातील बैठकीत पक्षाला विश्वासात घेतले नसल्याने एकनाथ शिंदे शिवसेनेत नाराजी निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संपर्कप्रमुख राम रेपाळे यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात पक्षाची स्वतंत्र बैठक घेण्यात आली.

या बैठकीत जिल्हा बँकेची (DCC Bank) निवडणूक एकनाथ शिंदे शिवसेना पूर्ण ताकदीने लढविणार, अशी भूमिका मांडण्यात आली. अंतिम निर्णय पक्षाचे प्रमुख नेते घेतील, अशी माहिती संपर्कप्रमुख राम रेपाळे यांनी दिली. विशेष म्हणजे, या बैठकीला एकनाथ शिंदे शिवसेनेचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठल लंघे उपस्थित नव्हते. जिल्ह्यात एकनाथ शिंदे शिवसेनेचे दोन आमदार असताना दोघांचीही अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली आहे.

जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याच्या उद्देशाने रविवारी संगमनेर (Sangamner) येथे सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली होती. दुष्काळी परिस्थिती आणि सहकार क्षेत्रासमोरील आव्हाने लक्षात घेऊन निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आली होती. मात्र, या बैठकीबाबत शिंदे शिवसेनेला माहिती देण्यात आली नसल्याची नाराजी पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली. त्यानंतर एकनाथ शिंदे शिवसेनेने तातडीने स्वतंत्र बैठक घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

Eknath Shinde Shiv Sena
Ahilyanagar DCC Bank Election : थोरात-विखे एकाच मंचावर; राम शिंदे, नीलेश लंके गैरहजर, जिल्हा बँकेच्या निवडणुकीत पुढे काय?

सध्याच्या घडामोडींमुळे बिनविरोध निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये महायुतीतील घटक पक्षांमध्ये समन्वयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हा बँक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, विविध राजकीय गटांकडून हालचालींना वेग आला आहे.

Eknath Shinde Shiv Sena
Ahilyanagar DCC Bank Politics : यशवंतराव गडाखांच्या हाकेनंतर 'विखे-थोरात' एकत्र; नगर जिल्हा बँकेसाठी शरद पवार पडद्यामागून सूत्रं हलवतायत?

बैठकीला कोण कोण उपस्थित?

एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बैठकीला खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, सिद्धार्थ मुरकुटे, सुजित झावरे, अरुण मुंढे, संभाजी कदम, अनिल शिंदे, हर्षदा काकडे, बाळासाहेब पवार, सुरेश पठारे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीत जिल्हा बँक निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाला विश्वासात न घेता निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतले जात असतील, तर शिंदे शिवसेना आपली स्वतंत्र ताकद दाखवेल, अशी भूमिका बैठकीत व्यक्त झाल्याचे समजते.

खताळ-लंघे गैरहजर; राजकीय चर्चेला उधाण

दरम्यान, एकनाथ शिंदे शिवसेनेच्या बैठकीला आमदार अमोल खताळ आणि आमदार विठ्ठल लंघे गैरहजर राहिल्याने पक्षांतर्गत चर्चेला उधाण आले आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन्ही आमदारांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

खताळ-लंघेंच्या निर्णयावर विखे पाटलांचा प्रभाव?

खताळ आणि लंघे हे एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार असले तरी जिल्ह्यातील विविध राजकीय कार्यक्रमांमध्ये ते पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत दिसतात. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीतील पुढील राजकीय भूमिका ठरवताना विखे पाटील यांच्या भूमिकेचा काही प्रभाव राहणार का, याबाबत स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, खताळ आणि लंघे यांच्या अनुपस्थितीमागील नेमके कारण किंवा त्यांची जिल्हा बँक निवडणुकीबाबतची स्वतंत्र भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

बिनविरोध निवडणूक की थेट लढत?

अहिल्यानगर जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रमुख राजकीय नेत्यांमध्ये चर्चा सुरू असतानाच विविध गटांकडून उमेदवारी अर्जांची खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे बिनविरोध निवडणुकीच्या प्रयत्नांसमोर स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणांचे आव्हान उभे राहिले आहे. एकीकडे बाळासाहेब थोरात, सुजय विखे पाटील यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या बैठकीत बिनविरोध निवडणुकीसाठी सहमतीचा प्रयत्न सुरू आहे; तर दुसरीकडे एकनाथ शिंदे शिवसेनेने स्वतंत्र बैठक घेत पूर्ण ताकदीने निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता महायुतीतील जागावाटप, शिंदे शिवसेनेची भूमिका आणि आमदार अमोल खताळ व विठ्ठल लंघे यांची पुढील भूमिका याकडे अहिल्यानगरच्या सहकार आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com