Balasaheb Thorat, Nilesh Lanke and Ram Shinde Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar DCC Bank Election : जिल्हा बँकेसाठी थोरात-लंके एकत्र येईनात? राम शिंदेंच्या हालचालींनी वाढवली उत्सुकता

Political equations shift ahead Ahilyanagar District Bank election Balasaheb Thorat, Nilesh Lanke and Ram Shinde take different positions : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न; 22 तारखेला अर्ज माघारीनंतर चित्र स्पष्ट होणार, जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग

Pradeep Pendhare

Ahilyanagar District Bank Election 2026 : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे चित्र 22 तारखेला, अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी स्पष्ट होईल. जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्यासह सर्वपक्षीय स्थानिक नेते प्रयत्नशील आहे. यासाठी कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी थोरात अन् विखे पाटील एकत्र आले.

परंतु भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आणि शरद पवार राष्ट्रवादीचे खासदार नीलेश लंके हे थोरातांबरोबर एकत्र आलेले दिसले नाहीत. तसेच मंत्री विखे पाटील यांच्याबरोबर या उभय नेत्यांची सविस्तर, अशी बैठक झालेली नाही. तशी होण्याची शक्यता कमी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिनविरोधचा मार्ग खडतर असल्याचे दिसते.

जिल्हा सहकारी बँकेच्या (DCC Bank) निवडणूक दुष्काळामुळे बिनविरोध व्हावी यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे अमृतकुटीवर बैठक घेतली. भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी आपल्या कट्टर प्रतिस्पर्धी समोर हजेरी लावली. या बैठकीनंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या सोनईतील आमराईत थोरात-सुजय विखे पाटील यांची भेट झाल्याचे सांगितले जाते.

विखे पाटील यांनी एक पाऊल मागे घेत, बँकेच्या निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी थोरातांनी बोलवलेल्या बैठकीला हजेरी लावली. परंतु या बैठकीला भाजपचे (BJP) सभापती प्रा. राम शिंदे आणि खासदार नीलेश लंके उपस्थित नव्हते. ही बैठक सर्वांसाठी खुली होती, असे थोरातांनी पुढे स्पष्ट केले. या बैठकीनंतर खुप काही घडून गेले.

राम शिंदे यांनी निवडणुकीतून माघार घेण्यापूर्वी, संगमनेरमधील बैठकीवरून, भाजपचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना चांगलेच टार्गेट केले. जामखेड येथे मंत्री विखे पाटील अन् शिंदे दोघे एकत्र आले होते. मंत्री विखे पाटील यांनी यानंतर शिंदे नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. सुजय विखे पाटील यांनी महायुतीकडून मंत्री विखे पाटील आणि राम शिंदे निर्णय प्रक्रियेत असतील, असे जाहीर केले.

नीलेश लंकेंबरोबर नाराजांची फौज

या राजकीय घडामोडी घडत असतानाच, दुसरीकडे खासदार नीलेश लंकेंची भूमिका चर्चेत आहे. बाळासाहेब थोरात यांनी बोलावलेली बैठक टाळल्यानंतर ते थेट शरद पवार यांच्याकडे नाराजांची फौज घेऊन दिसले. त्यानंतर ते राम शिंदे यांच्याबरोबर बंद दाराआड चर्चा करताना दिसले. परंतु लोकसभा निवडणुकीत नीलेश लंके यांच्या विजयात मोठा वाटा असणारे थोरात यांच्याबरोबर ते जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून एकत्र दिसलेच नाही.

थोरात अन् लंके एकत्र दिसेनात

नीलेश लंके यांनी खासदारकीच्या विजयानंतर थोरातांना 'किंगमेकर' म्हटले होते. त्याच थोरातांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या बिनविरोधाच्या प्रयत्नात खासदार लंके कुठेच दिसत नाही. उलट ते राम शिंदे यांच्याबरोबर जास्त दिसत आहेत. तसेच राम शिंदे आणि भाजप महायुतीचे नेते मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात देखील जिल्हा बँकेच्या निवडणुकीवर चर्चा होताना दिसत नाही.

शिंदे अन् लंकेंची भूमिका वेगळी

महायुतीकडून सभापती प्रा. राम शिंदे आणि महाविकास आघाडीचे खासदार नीलेश लंके मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत वेगळी भूमिका दिसत आहे. तसे दोघांच्या हालचालीवरून दिसते. आज जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहे. राम शिंदे हे यशवंतराव गडाखांच्या भेट घेत आहेत. तर मंत्री विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात हे अहिल्यानगर शहरात आहेत. जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या राजकीय हालचालींकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT