Yashwantrao Gadakh Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar DCC Bank Election : ‘आता प्रचारात गुंतण्याची वेळ नाही’; जिल्हा बँक निवडणुकीवर गडाखांची भूमिका

Yashwantrao Gadakh urges an unopposed Ahilyanagar district bank election amid drought concerns : तीन महिन्यांनंतरही पावसाची ओढ; ‘निवडणुकीच्या प्रचारात गुंतण्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जा’, गडाखांचा नेत्यांना संदेश

Pradeep Pendhare

By विनायक दरंदले, (नेवासा, अहिल्यानगर)

Ahilyanagar District Cooperative Bank : अहिल्यानगर जिल्ह्यात तीन महिन्यांनंतरही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. धरणांमध्ये सध्या समाधानकारक पाणीसाठा असला तरी आगामी काळात पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिल्यास शेतीसाठी होणाऱ्या पाण्याच्या आवर्तनावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी केले आहे.

जिल्हा बँक निवडणुकीच्या (DCC Bank) पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. नेत्यांच्या गाठीभेटी, बैठका आणि संभाव्य पॅनेलच्या हालचाली सुरू आहेत. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्याने आता निवडणूक जाहीर होण्याची शक्यता वाढली आहे. मात्र, दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर संभाव्य दुष्काळाचे संकट उभे ठाकले आहे.

दुष्काळजन्य परिस्थितीत पद, प्रतिष्ठा आणि वर्चस्व सिद्ध करण्यासाठी निवडणूक घेणे योग्य नाही, अशी भूमिका यशवंतराव गडाख (Yashwantrao Gadakh Patil) यांनी मांडली. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सध्याच्या परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत जिल्हा बँकेची निवडणूक घेणे टाळावे, असे मत व्यक्त केले. जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकरी सभासद, महिला बचत गट, सेवा संस्था तसेच जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यांना पतपुरवठा केला जातो. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण मोठ्या प्रमाणावर जिल्हा बँकेशी जोडलेले आहे, असे गडाख यांनी सांगितले.

सध्या सुरू असलेले पाण्याचे आवर्तन संपल्यानंतर समाधानकारक पाऊस झाला नाही, तर पुढील महिन्यापासून दुष्काळाच्या झळा जाणवण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत सर्व तालुक्यांतील नेत्यांनी अनाठायी खर्च टाळून जिल्हा बँकेचे आर्थिक हित जपण्याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन गडाख यांनी केले. संभाव्य दुष्काळाची तीव्रता लक्षात घेता सर्वपक्षीय नेत्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याऐवजी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात आणि त्या सरकार दरबारी मांडाव्यात, अशी अपेक्षा गडाख यांनी व्यक्त केली. आताचा प्रसंग प्रचारात गुंतण्याचा नसून, संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना त्यातून बाहेर काढण्याचा आहे, असा संदेशही त्यांनी दिला.

31 वर्षे जिल्हा बँकेचे संचालक

यशवंतराव गडाख यांचा जिल्हा बँकेच्या कारभारातील दीर्घ अनुभव आहे. ते 1991 ते 2021 या कालावधीत तब्बल 31 वर्षे जिल्हा बँकेचे संचालक होते. तसेच 1993 ते 1995 आणि 1999 ते 2005 या कालावधीत सात वर्षे त्यांनी अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. संचालक आणि अध्यक्ष म्हणून काम करताना सहकार क्षेत्र तसेच शेतकरी हिताशी संबंधित अनेक निर्णय घेतल्याचा त्यांचा अनुभव आहे. त्यामुळे सध्याच्या दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT