Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar District Bank Election 2026 : अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी सोमवार ठरणार निर्णायक; विखे-थोरातांच्या बालेकिल्ल्यातून कोण उतरणार?

846 forms sold, 109 nominations filed; focus now shifts to Monday's final filing day in Ahilyanagar : 846 अर्जांची विक्री, 109 उमेदवारी अर्ज दाखल; राहाता-संगमनेरमधून अद्याप अर्ज नाहीत, विखे-राम शिंदेंमधील दुरावाही कायम

Pradeep Pendhare

Ahilyanagar District Bank Election 2026 candidates : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी 846 अर्जांची विक्री झाली असून, त्यातील 109 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोमवार आहे.

या दिवशी मोठ्या घडामोडी घडतील, असे चित्र आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राहाता, तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेरमधून उमेदवारांचे अर्ज दाखल झालेले नाहीत. विखे पाटील अन् थोरात यांच्या प्रभाव क्षेत्रातून उमेदवारी कोण दाखल करतो आहे, याकडे लक्ष लागले आहे.

भाजपांतर्गत परस्परांचे विरोधक असलेले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) आणि विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे जामखेड येथे दुष्काळी आढावा बैठकीसाठी एकाच व्यासपीठावर एकत्र आले होते. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील त्यांचा दुरावा कायम दिसला. जिल्हा बँकेच्या शहकाटशह सुरू असल्याने त्यांच्यातील दुरावा उघड झाला. विखे पाटील यांनी बँकेच्या निवडणुकीवर बोलण्यास स्पष्ट नकार दिला, तर राम शिंदेंनी देखील विखे पाटील यांच्याशी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचे म्हटले.

अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके आणि अजित पवार राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांचे समर्थक आमने-सामने येताच आपापल्या नेत्याची घोषणाबाजी सुरू केली. समर्थकांचा आक्रमकपणा पाहून, खासदार लंके यांनी, केवळ जिंदाबादच्या घोषणा देऊ नका, तर हम तुम्हारे साथ है म्हणा, असे म्हणताच दोन्ही बाजूने हशा पिकला. यानंतर खासदार लंके आणि आमदार लहामटे यांची गळाभेट झाली.

या निवडणुकीत पती-पत्नी, पिता-पुत्र, चुलतभाऊ अशांनीही एकत्रित उमेदवारी अर्ज दाखल केले. माजी आमदार तथा जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष चंद्रशेखर घुले व त्यांची पत्नी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हा बँकेचे माजी संचालक राजेंद्र नागवडे व त्यांची पत्नी माजी संचालक अनुराधा नागवडे, आमदार प्राजक्त तनपुरे व त्यांचे चुलतबंधू हर्ष तनपुरे, माजी संचालक अंबादास पिसाळ व त्यांचे चिरंजीव तुषार पिसाळ यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

आजपासून सलग तीन दिवस सुट्टी आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकच दिवस, सोमवार उरला आहे. या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडणार आहे. आतापर्यंत खासदार नीलेश लंके, आमदार आशुतोष काळे, आमदार मोनिका राजेळ, आमदार किरण लहामटे, आमदार काशिनाथ दाते यांच्यासह माजी आमदार चंद्रशेखर घुले, माजी आमदार वैभव पिचड, तर आमदार विठ्ठल लंघे यांनी पत्नीसाठी अर्ज नेला. सातीराम गायकर, माजी संचालक करण ससाणे, अमोल राळेभात, राजेंद्र नागवडे, अंबादास पिसाळ, अनुराधा नागवडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT