Radhakrishna Vikhe Patil Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar DCC Bank Election : अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीआधी भाजपमध्ये हालचाली; राम शिंदेंच्या गाठीभेटींवर विखेंचा टोला, 'सहकारातील निवडणुका बिनविरोधही होतात'

Political activity intensifies ahead of Ahilyanagar DCC Bank election : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणणुकीनिमित्ताने प्रा. राम शिंदे यांच्या गाठीभेटी, विवेक कोल्हे यांची बिनविरोधची भूमिका आणि त्यावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिक्रिया यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar District Cooperative Bank : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसला, तरी जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजप विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी विविध सहकारी संस्थांतील नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

दुसरीकडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या हालचालींवर प्रतिक्रिया देताना, "कोण कुठे जातो, याला फारसे महत्त्व नाही. सहकारातील निवडणुका बिनविरोधही होत असतात," असे म्हटले आहे.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी (DCC Bank) सहकारी संस्थांचे ठराव सादर करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांची छाननी झाल्यानंतर अंतिम मतदार यादी विभागीय आयुक्तांकडे मंजुरीसाठी पाठवली जाणार आहे. त्यानंतर निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्याआधीच राजकीय हालचालींना वेग आला आहे.

प्रा. राम शिंदे (Ram Shinde) यांनी विविध नेत्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या असून, समविचारी पॅनल उभारणीबाबत चर्चा सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आणि जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष बाजीराव खेमनर यांची भेट घेतली. तसेच भाजप आमदार प्राजक्त तनपुरे यांच्याशीही भेटीचे नियोजन असल्याची माहिती आहे.

दरम्यान, भाजप आमदार विवेक कोल्हे यांनी राहाता येथील कार्यक्रमात जिल्हा बँकेची निवडणूक समविचारी गटांनी एकत्र येऊन बिनविरोध करण्याची भूमिका पुन्हा मांडली. या वक्तव्यामुळे सहकार क्षेत्रातील राजकीय चर्चांना आणखी वेग आला आहे.

मंत्री विखेंना जाणवतेय आमदार कर्डिलेंची उणिव

सध्या जिल्हा सहकारी बँकेवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे वर्चस्व आहे. दिवंगत आमदार आणि माजी अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी आणि आगामी निवडणुकीची पार्श्वभूमी यामुळे या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले आहे.

प्रा. शिंदेंच्या गाठीभेटीवर मंत्री विखेंचा टोला

प्रा. राम शिंदे यांच्या गाठीभेटींवर प्रतिक्रिया देताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, "कोण कुठे जातो, याला फारसे महत्त्व नाही. सहकारातील निवडणुका बिनविरोधही होत असतात," असे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात विविध स्तरांवर चर्चा सुरू आहे.

निवडणूक बिनविरोध की चुरशीची?

राजकीय विश्लेषकांच्या मते, जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक ही स्थानिक सहकार आणि राजकारणाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. निवडणूक बिनविरोध होणार की चुरशीची लढत होणार, याबाबतची स्पष्टता अधिकृत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरच होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT