Nilesh Lanke Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke : सुजय विखेंच्या जिल्हा बँकेत लंके नांगर घेऊन उतरणार; 2850 कोटींच्या कर्जवाटपाचा हिशेब मागणार!

Nilesh Lanke takes aggressive stand Ahilyanagar DCC Bank, alleging ₹2,850 crore bogus loans sugar factories and promising expose irregularities secure justice for farmers : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या संचालकपदी निवड झाल्यानंतर खासदार नीलेश लंके आक्रमक; कारखानदारांना 2850 कोटींची कथित बोगस कर्जे दिल्याचा आरोप, सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अनियमितता उघड करण्याचा इशारा.

Pradeep Pendhare

Nilesh Lanke on Ahilyanagar District Bank : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष डाॅ. सुजय विखे पाटील यांच्या हाती आला आहे. तर विरोधक म्हणून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके उभे ठाकले आहेत. या दोघांमधील राजकीय संघर्ष सर्वश्रुत असताना, एकमेकांविरोधात दंड थोपटले आहेत.

यातच खासदार लंकेंनी जिल्हा बँकेत आक्रमक भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट संकेत दिलेत. जिल्हा बँकेत पहिल्याच दिवशी हातात नांगर घेऊन जाणार असून, बँकेच्या माध्यमातून कारखानदारांना कोट्यवधी रुपयांची कर्जे दिली जात असतील, तर सर्वसामान्य शेतकऱ्यांनाही कर्ज मिळाले पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी बँकेतील कारभारातील अनियमितता चव्हाट्यावर आणल्याशिवाय शांत बसणार नाही, असा इशारा दिला आहे.

पारनेर तालुक्यातील पठार भागातील किन्ही येथे विविध विकास सेवा सोसायटीच्या नवीन इमारतीसह विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन तसेच अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांचा सत्कार झाला.

खासदार लंके यांनी, जिल्हा बँकेत (DCC Bank) कारखानदारांना सुमारे 2850 कोटी रुपयांची बोगस कर्जे वाटप करण्यात आली, तर काहींना हातावर कर्ज दिल्याचे प्रकार आहेत. या सर्व बाबींचा जाब विचारण्याची माझी भूमिका राहणार आहे. बँकेत गेल्यानंतर माझ्या हातात नांगर असेल. शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणार आहे. धनदांडग्यांशी माझे नाते नाही, तर गोरगरीब जनतेशी माझे नाते आहे. मी शेतकऱ्यांना न्याय देऊ शकत नसेल, तर मला बँकेत जाण्याचा अधिकार नाही, असा घणाघात केला.

मोठ्या लोकांच्या मुलांना कारखाने उभारण्यासाठी आर्थिक मदत मिळते; मात्र शेतकऱ्यांच्या मुलांनीही उद्योजक झाले पाहिजे, त्यांना व्यवसाय उभारण्यासाठी बँकेने पाठबळ दिले पाहिजे, ही माझी भूमिका आहे. शेतकऱ्यांच् (Farmer) या हितासाठी काम करताना कोणाचाही मुलाहिजा ठेवणार नाही, असा इशारा खासदार लंकेंनी दिला.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सर्वसामान्य जनतेने मला मोठी मदत केली. सर्व स्तरांतून मिळालेल्या सहकार्यामुळेच ही निवड शक्य झाली. यापुढील काळात तालुक्यातील प्रत्येक निवडणूक मायक्रो प्लॅनिंग करून लढवली जाईल. सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी संघटितपणे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना लंके म्हणाले की, आम्ही सत्तेत कधी बसतो, याची मी वाट पाहत आहे. मात्र, समोरच्यांना हटवूनच सत्तेत बसणार, त्यांच्यात जाऊन बसणार नाही. राजकारणात दिवस कधी बदलतील, हे सांगता येत नाही. सध्या झालेल्या निवडणुकांनंतर जनतेचा विचार बदलत असल्याचे दिसत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने ठोस निर्णय घेतले नाहीत, त्यामुळे सरकारविषयी प्रचंड नाराजी आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती असून, या काळात सर्वसामान्य शेतकरी वर्गाला मदत करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे खासदार लंकेंनी सांगितले.

SCROLL FOR NEXT