Eknath Shinde Shiv Sena warn Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP boycott : महायुतीत ‘कर्जकांड’वरून फूट? भाजपच्या बहिष्काराने महासभा तहकूब; एकनाथ शिंदे शिवसेनेचा कोर्टात जाण्याचा इशारा

BJP and Ajit Pawar NCP faced embarrassment Ahilyanagar Municipal Corporation general body meeting adjourned over controversial loan proposals and land acquisition issues, Eknath Shinde Shiv Sena warned legal battle : भाजप-अजित पवार राष्ट्रवादीने महापालिकेतील कर्ज प्रस्तावाविरोधात एकनाथ शिंदे शिवसेनेने आयुक्तांची भेट घेत, अधिक आक्रमक होण्याचा इशारा दिला.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Municipal Corporation : नेहरू मार्केट, सर्जेपुरा रंगभवन, प्रोफेसर कॉलनी चौक, जुने एनसीसी कार्यालय आणि गंज बाजार येथील व्यापारी संकुलांसाठीच्या कर्ज प्रस्तावासह बोल्हेगाव-सावेडी-कल्याण रस्त्यांच्या भूसंपादनाच्या मुद्द्यावरून ऐनवेळी भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांना महासभेकडे पाठ फिरवावी लागली.

सत्ताधाऱ्यांच्या बहिष्कारामुळे महासभा तहकूब झाली असली, तरी हे प्रकरण संपलेले नाही. हा विषय पुन्हा मंजुरीसाठी आणल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दिला आहे.

पूर्ण बहुमतासह भाजप (BJP) आणि अजित पवार राष्ट्रवादीने अहिल्यानगर महापालिकेची सत्ता मिळवली असली, तरी त्यांच्या कारकिर्दीत प्रथमच महासभा तहकूब करण्याची नामुष्की ओढावल्याने महायुतीतील अंतर्गत धुसफूस उघड झाली आहे. महासभेतील विषय निश्चित करताना अजित पवार राष्ट्रवादी भाजपला विश्वासात घेत नसल्याची तक्रार भाजप नगरसेवकांकडून पक्षश्रेष्ठींकडे करण्यात आली.

याच नाराजीतून भाजप नगरसेवकांनी महासभेला गैरहजर राहण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, महापालिकेपासून (Municipal) अवघ्या काही अंतरावर थांबून भाजप नगरसेवकांनी सभागृहात न जाण्याचा निर्णय घेतला आणि अखेर सभा तहकूब झाली.

महासभा तहकूब होण्यापूर्वी भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फोनाफोनी झाल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. दरम्यान, या कर्ज प्रस्तावाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सुरुवातीपासूनच जोरदार विरोध दर्शवला होता. “हा कर्ज प्रस्ताव म्हणजे नगरकरांच्या डोक्यावर आर्थिक डोंगर लादण्याचा प्रकार आहे,” असा आरोप किरण काळे यांनी केला होता.

आता या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांची शिवसेनाही आक्रमक झाली आहे. चुकीच्या कर्जाचा बोजा नागरिकांवर टाकू नये, अशी मागणी करत शिवसेनेने आयुक्तांकडे निवेदन दिले आणि प्रस्तावाची प्रतीकात्मक होळीही केली. हा प्रस्ताव पुन्हा महासभेत मंजुरीसाठी आणल्यास न्यायालयीन लढाई छेडण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे.

यावेळी शिवसेनेने भाजप आणि अजित पवार राष्ट्रवादीला थेट लक्ष्य केले. “राज्यात महायुतीचे सरकार असताना महापालिकेसाठी 100 टक्के अनुदान मिळवण्याचा प्रयत्न करा. आधीच महापालिकेवर तब्बल 800 कोटी रुपयांची देणी आहेत. अशात पुन्हा नवीन कर्ज काढून दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न करू नका,” असा टोला शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी लगावला.

महापालिका निवडणुकीत महायुतीबाहेर ठेवण्यात आलेल्या एकनाथ शिंदे शिवसेनेने आता सत्ताधारी भाजप-अजित पवार राष्ट्रवादीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात महापालिकेतील सत्ताधाऱ्यांविरोधात शिवसेनेची भूमिका अधिक आक्रमक होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT