Rani Lanke Or Karan Sasane Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Balasaheb Thorat : 'काही तासांत चित्र स्पष्ट होईल'; मविआच्या उमेदवारीवर बाळासाहेब थोरातांचे सूचक वक्तव्य, सस्पेन्स वाढला

MVA candidate suspense continues Ahilyanagar MLC election; Balasaheb Thorat says decision likely by 3 PM : महाविकास आघाडीत अहिल्यानगर विधान परिषदेच्या उमेदवारीवरून रस्सीखेच कायम असून, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादीने जागेवर दावा केला आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar MLC Election : अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार, याबाबतचा सस्पेन्स अखेरच्या टप्प्यातही कायम आहे.

काँग्रेसचे करण ससाणे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या राणी लंके यांना उमेदवारी मिळणार, याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या विधानामुळे उत्सुकतेत आणखी भर पडली आहे.

विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC Election) उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज अखेरचा दिवस असून, अर्ज भरण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. तरीही महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार निश्चित झालेला नसल्याचे चित्र दिसत आहे. या जागेवर काँग्रेस आणि शरद पवार गट या दोन्ही पक्षांनी दावा ठोकल्याने आघाडीत पडद्यामागे जोरदार चर्चा सुरू असल्याची माहिती आहे.

काँग्रेसकडून (Congress) करण ससाणे आणि दीप चव्हाण यांनी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या राणी लंके यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे उमेदवारीच्या शर्यतीत अचानक नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

याबाबत माध्यमांशी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले, आज दुपारी तीन वाजेपर्यंत योग्य निर्णय झालेला दिसेल. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष चर्चा करूनच उमेदवार निश्चित करत आहेत. थोरात यांच्या या वक्तव्यानंतर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याचे स्पष्ट झाले असून, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असणार यावरील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना बाळासाहेब थोरात यांनी प्रादेशिक पक्षांच्या भवितव्यावर भाष्य केले. अनेक नेते भाजपमध्ये जात असल्याने राज्यात आणि जिल्ह्यात नवीन नेतृत्वाला संधी निर्माण होत आहे. प्रादेशिक पक्षांची ताकद कमी होत चालली आहे. भविष्यात देशात काँग्रेस आणि भाजप हेच दोन प्रमुख राष्ट्रीय पक्ष उरतील, अशी परिस्थिती निर्माण होत आहे, असे थोरात म्हणाले. ते पुढे म्हणाले, देशातील बदलती राजकीय परिस्थिती पाहता लोक पुन्हा काँग्रेसकडे आशेने पाहू लागले आहेत. काँग्रेसच्या विचारसरणीवर जनतेचा विश्वास कायम असल्याचे हे संकेत आहेत.

लडक्यांचा सरकारकडून विश्वासघात

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील तब्बल 81 लाख लाभार्थींना अपात्र ठरविण्यात आल्याच्या मुद्द्यावरूनही थोरात यांनी सरकारवर जोरदार टीका केली. लाडक्या बहिणींसोबत सरकारने विश्वासघात केला आहे. अजूनही सत्ताधाऱ्यांचे अनेक निर्णय आणि धोके पुढे येतील. विधानसभा निवडणुकीत महिलांच्या पाठिंब्यामुळे महायुतीला मोठे यश मिळाले, मात्र आता त्याच महिलांची फसवणूक सुरू झाली आहे, असा आरोप त्यांनी केला.

राणी लंके की करण ससाणे?

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपण्यास काही तास शिल्लक असताना महाविकास आघाडीची अंतिम भूमिका काय असेल, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. राणी लंके की करण ससाणे? या प्रश्नाचे उत्तर आता काही तासांतच मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT