Maharashtra Legislative Council Election : स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून भाजपने माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी दिल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीची चर्चा रंगली होती. ही जागा पूर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने आणि भाजपने ती आपल्या वाट्याला घेतल्याने स्थानिक पातळीवर अस्वस्थता निर्माण झाली होती.
विशेषतः आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांकडून नाराजीचे सूर उमटत होते. मात्र, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या नाराजीची धारच बोथट केल्याचे चित्र दिसत आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम टप्प्यात विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी राष्ट्रवादी वेगळी भूमिका घेणार नसल्याचा दावा करत राजकीय चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. संग्राम जगताप हे उमेदवारी निश्चित करण्याच्या प्रक्रियेत सहभागी आहेत. माझे त्यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतीही वेगळी भूमिका घेतली जाणार नाही, याची मला खात्री आहे, असे ते म्हणाले.
राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की, प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांच्या उदयानंतर संग्राम जगताप यांची महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी हुकली होती. ही खंत त्यांनी तत्कालीन नेतृत्वाकडे व्यक्त केल्याचीही चर्चा होती. त्यानंतर विकास निधी आणि राजकीय समतोल साधत हा विषय मागे पडला. मात्र, बदललेल्या राजकीय समीकरणांमध्ये पुन्हा एकदा प्राजक्त तनपुरे आणि संग्राम जगताप हे एकाच राजकीय पटावर समोरासमोर आल्याने जुन्या नाराजीच्या चर्चांना उधाण आले.
याच पार्श्वभूमीवर जगताप समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढल्याचे बोलले जात होते. अजित पवार राष्ट्रवादीचे स्थानिक नेते आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांनीही ही नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. त्यामुळे महायुतीत अंतर्गत बंडखोरीची शक्यता निर्माण झाल्याची चर्चा रंगली होती.
दरम्यान, जगताप समर्थकांकडून सचिन जगताप यांचा उमेदवारी अर्ज नेण्यात आल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे ते अपक्ष किंवा बंडखोर उमेदवार म्हणून मैदानात उतरणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा काही वेळ शिल्लक असतानाही सचिन जगताप यांच्या उमेदवारीसंदर्भात कोणतीही ठोस हालचाल दिसून आली नाही. ना अर्ज दाखल करण्याची तयारी, ना समर्थकांची राजकीय मोर्चेबांधणी.
एकीकडे जगताप समर्थकांच्या नाराजीची चर्चा, तर दुसरीकडे विखे पाटील यांचा आत्मविश्वासपूर्ण दावा यामुळे निर्माण झालेला राजकीय सस्पेन्स अखेर फुसका ठरताना दिसत आहे. आतापर्यंतच्या घडामोडींवरून संग्राम जगताप गटाकडून प्रत्यक्ष बंडखोरीची शक्यता अत्यंत क्षीण असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांच्या उमेदवारीविरोधातील नाराजीचे वादळ अखेर "पेल्यातले वादळ" ठरल्याचीच चर्चा आता अहिल्यानगरच्या राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.