Ahilyanagar prabhag rachana approval Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahilyanagar prabhag rachana approval : शिंदे शिवसेनेनं सोय साधली? ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा थयथयाट; विरोधकांच्या 43 हरकती फेटाळल्या, तर सत्ताधाऱ्यांची मंजूर

Ahilyanagar Election Ward Plan Approved by State Election Commission : अहिल्यानगर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवर प्राप्त हरकतींपैकी एक हरकत अंशतः मान्य करण्यात आली आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Municipal Corporation election : अहिल्यानगर महापालिकेची रखडलेली प्रारूप प्रभाग रचनेवर राज्य निवडणूक आयोगाने काल सोमवारी शिक्कामोर्तब केला.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांनी प्रभागात अंशत बदल करत, प्रारूप आराखड्याला मंजूर दिली. राज्य निवडणूक आयोगाच्या या आरखड्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने थयथयाट केला असून, न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचनेवर विरोधकांच्या 43 हरकती नोंदवल्या होत्या. या सर्व हरकती फेटाळण्यात आला. यात सत्ताधाऱ्यांची एक हरकत अंशत: मंजूर करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग 9, 15 व 16 या तीन प्रभागात काही बदल करण्यात आले आहेत.

हे तिन्ही प्रभाग एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत दाखल झालेल्या माजी नगरसेवकांचे आहेत. या प्रभागात अंशतः बदल करण्यात येत मंजूरी देण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मंजूर केलेल्या प्रारूप आराखड्यात सत्ताधाऱ्यांची सोय पाहिल्यानं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

नेमका काय बदल

नगर विकास विभागाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार अहिल्यानगर महापालिका (AMC) प्रभाग रचना तयार करून प्रारूप आराखडा प्रसिद्ध करण्यात आला. त्यावर आलेल्या 43 हरकतींपैकी एक हरकत अंशतः मान्य करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभाग 15 मधून प्रशांत सोसायटी परिसर व इतर भागाचे दोन ब्लॉक प्रभाग 9 मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 9 ची लोकसंख्या 22 हजार 91 झाली आहे.

आयुक्त डांगेंची माहिती

प्रभाग 15 मधून दोन ब्लॉक कमी झाल्याने सरासरी लोकसंख्या कायम ठेवण्यासाठी अतिरिक्त लोकसंख्या प्रभाग क्रमांक 16 मधील शंकर महाराज मठ परिसर व अरुणोदय मंगल कार्यालय परिसर, असे दोन ब्लॉक प्रभाग क्रमांक 15मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 15 ची लोकसंख्या 18 हजार 304 व प्रभाग क्रमांक 16ची लोकसंख्या 21 हजार 61, अशी झाल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली.

महापालिकेचे नगर विकासकडे बोट

राज्य शासनाच्या वेळापत्रकानुसार 13 ऑक्टोबरपर्यंत अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध करण्याची मुदत होती. मात्र, नगर विकास विभागानेच हे वेळापत्रक जाहीर केले होते व त्यांच्याकडून अंतिम प्रभाग रचना 20ऑक्टोबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली.

अंतिम नकाश संकेतस्थळावर

राज्य निवडणूक आयोगानेही या अंतिम प्रभाग रचनेच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यानुसार अंतिम प्रभाग रचना महापालिकेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर अंतिम नकाशे, व्याप्ती नागरिकांच्या माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी सांगितले.

न्यायालयात जाण्याचा इशारा

दरम्यान, महापालिकेची प्रभाग रचना पूर्णतः बेकायदेशीर पद्धतीने, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि काही स्थानिक नेत्यांच्या दबावाखाली करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने नियम व प्रक्रिया धाब्यावर बसवून प्रशासनाच्या हातचे खेळणे झाले आहे. ही रचना आम्हाला मान्य नाही, आम्ही न्यायालयाचे दरवाजे ठोठावू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी दिला.

सत्ताधाऱ्यांच्या हस्तक्षेपाची कबुली

प्रभाग क्रमांक 9, 15, 16मध्ये बदल करण्यात आले आहेत. सर्व प्रभागांमध्ये मिळून गंभीर स्वरूपाच्या 43 हरकती असताना देखील एकच हरकत अंशतः मान्य केली गेली. तीही सत्ताधारी महायुतीच्या दबावतून केली गेली. नदी, नाले, ओढे, मुख्य रस्ते, फ्लाय ओव्हर यामधील भौगोलिक सलगता तोडून, मोडून सत्ताधाऱ्यांच्या राजकीय फायद्यासाठीची केलेली रचना मात्र महायुतीच्या दबावातून तशीच ठेवली गेली. ही तर सत्ताधारी महायुतीच्या राजकीय हस्तक्षेपाची कबुली असल्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT