Yashwant Dange Commissioner controversy : अहिल्यानगर मनपा निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर करून 15 सप्टेंबरपर्यंत हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्यावतीने शहरप्रमुख किरण काळे यांनी सर्व प्रभागांमध्ये मिळून एकूण 14 हरकती घेतल्या होत्या.
आज सकाळी जिल्हाधिकारी यांच्यासमोर हरकतींची सुनावणी सुरू असताना मार्गदर्शक सूचनांमध्ये नमूद नद्या, नाले, रेल्वे पूल, रस्ते यांना न ओलांडण्याच्या सूचना असताना देखील सत्ताधाऱ्यांना लाभ होईल अशाप्रकारे रचना केल्याचा जोरदार युक्तिवाद पुराव्यांसह हरकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने केला.
जिल्हाधिकाऱ्यांसमोरच किरण काळे यांनी आयुक्त यशवंत डांगे यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी यशवंत डांगे निरूत्तर झाले. सत्तेचा गैरवापर करून महापालिका निवडणुकीत (Election) रडीचा डाव खेळत जिंकण्यासाठी वोट चोरी पेक्षाही भयानक षडयंत्र सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करून रचल्याचा गंभीर आरोप सुनावणीनंतर केला.
सन 2018च्या रचनेतील प्रभाग सातमधील नागापूर गावठाण नव्या रचनेमध्ये प्रभाग एकमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. सुमारे 2200 ते 2400 मतदान (Voter) यामध्ये वळवण्यात आले आहे. यावर काळेंनी युक्तिवाद करताना म्हटले की, सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे नद्या न ओलांडण्याच्या सूचना असताना देखील, अशी कोणती अपरिहार्यता निर्माण झाली की नदी ओलांडून नागापूर गावठाण प्रभाग एकमध्ये समाविष्ट केले?
यावर आयुक्त डांगे यांनी प्रत्युत्तर देताना सांगितले की, "आम्ही अहिल्यानगर-मनमाड रस्ता हा निकष पकडला." यावर संतप्त होत काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रभाग 17 मध्ये रेल्वे रूळ, रेल्वे फ्लाय ओव्हर, अहिल्यानगर-दौंड रोड ओलांडला गेला, प्रभाग 13मध्ये उड्डाणपूल, तर प्रभाग पाचमध्ये अहिल्यानगर-मनमाड रोड, पत्रकार चौक ते डीएसपी चौक रोड, छत्रपती संभाजीनगर रोड ओलांडले गेले हे निदर्शनास आणून दिले.
किरण काळे यांनी तेही बेकायदेशीरच आहे, याकडे लक्ष वेधले. तिथे नियम धाब्यावर बसवता आणि प्रभाग एकमध्ये अहिल्यानगर-मनमाड रोड निकषात पकडल्याचे सांगता, असे आयुक्तांना सुनावले. किरण काळे एवढ्यावर थांबले नाहीत, तर त्यांनी आयुक्त हे शहराच्या लोकप्रतिनिधींच्या शिफारशीने खुर्चीवर विराजमान झाले आहेत. प्रभाग एकमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे चार नगरसेवक आहेत. त्यांची राजकीय सोयीसाठी हा 'विशेष फेवर' आयुक्तांनी राजकीय संगनमत आणि दबावातून केल्याचा आरोप केला. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी काळे यांना रोखले. मात्र काळे यांनी प्रभाग एक आणि आठमधील नागरिकांना न्याय देण्याची मागणी लावून धरली.
अधिकाऱ्यांनी यावेळी प्रभाग आठची लोकसंख्या 19 हजार 812 असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रभाग एकमध्ये भाग समाविष्ट केल्याचे दुसरे उत्तर दिले. त्यावर जोरदार हरकत घेत सरकारच्या निकषांप्रमाणे एका प्रभागात 22 हजार 437 लोकसंख्ये पर्यंत समावेश करता येऊ शकत असताना देखील राजकीय दबावातून नागापूर गावठाण हलविण्यात आल्याचा आक्षेप किरण काळे यांनी घेतला.
याचवेळी किरण काळे यांनी सन 2018च्या रचनेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या बालेकिल्ला असणाऱ्या प्रभाग सात, आठ, 10, 12, 13, 15, 16 यांची मोडतोड करण्यात आल्याबाबत देखील आक्षेप घेतला.
सर्वच प्रभागांमध्ये मागासवर्गीय तसेच अल्पसंख्याक समाजाला विशेष टार्गेट केल्याचा आरोप यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने केला. निवडणूक आयोग पारदर्शक आणि मुक्त वातावरणात व्हायला हव्यात. मात्र निवडणूक आयोग, प्रशासन भारतीय संविधान धाब्यावर बसवून अहिल्यानगर महापालिकेच्या निवडणुकीची पूर्वतयारी ही सत्ताधाऱ्यांच्या राजकीय लाभाची करून नागरिकांना मात्र वेठीस धरले जात आहे, असेही शिवसेना ठाकरे सेना पक्षाने म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांसमोर युक्तिवाद करत असताना किरण काळे म्हणाले, अधिकारी तीन वर्षानंतर बदली होऊन निघून जातील. अधिकाऱ्यांना काय फरक पडतो? पण या शहराच्या आमच्या नागरिकांना संपूर्ण आयुष्य व्यथित होणार आहे. राजकीय दबावातून प्रभागांची अशाप्रकारे मोडतोड करून तुम्ही नगरकरांना वेठीस का धरता? असा संतप्त सवाल किरण काळेंनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.