Ahilyanagar municipal election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी दाखल 788 उमेदवारी अर्जांपैकी 17 अर्ज छाननी प्रक्रियेत बाद करण्यात आले. त्यात सर्वाधिक अर्ज एकनाथ शिंदे शिवसेनेचे एबी फॉर्म बाद झाले आहेत.
उमेदवार राहुल कातोरे यांचा अर्ज अवैध ठरल्याने त्यांचे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विरोधी उमेदवार कुमारसिंह वाकळे यांचा मार्ग सोपा झाला. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या अन्य पाच उमेदवारांचे एबी फॉर्म फेटाळण्यात आल्याने त्यांना अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी दाखल 788 उमेदवारी अर्जांची आज छाननी करण्यात आली. त्यात एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेच्या एबी फॉर्मचा गोंधळ समोर आला आहे. ऐनवेळी काहींना एबी फॉर्मच्या झेरॉक्स दिल्या, तर काहींच्या एबी फॉर्मवर खाडाखोड करण्यात आली. काही फॉर्मवर, तर चक्क व्हाईटनर लावण्यात आले. एबी फॉर्मचे वाटप करताना एकनाथ शिंदे शिवसेनेचे नियोजन चुकले. त्यामुळे ऐनवेळी हा सर्व गोंधळ झाला.
छाननी प्रक्रियेत एकनाथ शिंदे शिवसेनेचे (Shivsena) उमेदवार राहुल कातोरे यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला. त्यांच्या अर्जावरील अनुमोदकाच्या सहीवर आक्षेप घेण्यात आला होता. छाननी प्रक्रियेत अनुमोदकाच्या सहीची प्रत्यक्ष पडताळणी झाल्यानंतर सही चुकीची असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला नसल्याने या जागेवरील त्यांच्या विरोधातील कुमारसिंह वाकळे यांचा मार्ग मोकळा झाला आहे.
त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार विशाल शितोळे यांनी एबी फॉर्म जोडलेला नव्हता, त्यामुळे त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला. परंतु त्यांचा दुसरा अपक्ष अर्ज असल्याने त्यांना दिलासा मिळाला. शिवसेनेचे दुसरे उमेदवार अमित खामकर यांनी एबी फॉर्मची झेरॉक्स प्रत जोडल्याने त्यांचाही अर्ज बाद ठरला आहे, तर शिवसेनेचे उमेदवार हर्षवर्धन कोतकर व गौरी नन्नवरे यांच्या एबी फॉर्मवर खाडाखोड असल्याने त्यांचे अर्ज बाद ठरले आहेत.
एकनाथ शिंदे शिवसेनेने 54 जागांवर आपले उमेदवार दिले आहेत. परंतु काही उमेदवारांना ऐनवेळी एबी फॉर्म देण्यात आले. त्यात काहींना खाडाखोड करून, तर काहींना चक्क एबी फॉर्मच्या झेरॉक्स प्रत देण्यात आल्या. छाननी प्रक्रियेत शिवसेनेचा एबी फॉर्मचा हा गोंधळ समोर आला आहे. राहुल कातोरे वगळता इतर उमेदवारांचे अर्ज एबी फॉर्म वगळून अपक्ष अर्जामध्ये रूपांतरीत झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेला या उमेदवारांना आता पुरस्कृत करावे लागणार आहेत.
एकनाथ शिंदे शिवसेनेचे उमेदवार राहुल कातोरे यांचा अर्ज बाद झाल्याने अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार कुमारसिंह वाकळे यांचा मार्ग जवळपास मोकळा झाला आहे. शिवसेनेला या जागेवर उमेदवार मिळणे कठीण झाले होते. राहुल कातोरे यांनी अर्ज दाखल केला, परंतु तो देखील बाद झाला. आता या जागेवर वाकळे यांच्या विरोधात पोपट कोलते यांचा एकमेव अपक्ष अर्ज आहे. कोलते प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी करतात. परंतु त्यांना जेमतेम दोनशे ते तीनशे मतांवर समाधान मानावे लागते. त्यामुळे वाकळे यांचा मार्ग सोपा झाला आहे.
एकनाथ शिंदे शिवसेना पक्षाविरोधात कारवाई केल्याच्या पार्श्वभूमीवर युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश कातोरे व युवा सेना शहरप्रमुख महेश लोंढे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. शिवसेना पक्षात अधिकृत पदावर कार्यरत असताना, महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराविरोधात इतर पक्षाकडून उमेदवारी दाखल करून त्यांनी पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. संबंधित दोन्ही पदाधिकाऱ्यांची तत्काळ पदनियुक्ती रद्द करण्यात येत असल्याची माहिती अनिल शिंदे यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.