Nilesh Lanke criticism Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nilesh Lanke criticism : लंकेंचा तोफखाना धडाडला; विखेंसह जगतापांना सूचक इशारा, महापौर देखील सांगून टाकला...

Ahilyanagar Municipal Election: Nilesh Lanke Slams BJP Leaders Vikhe, Jagtap at Savedi MVA Rally : महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी झालेल्या सभेत खासदार नीलेश लंके यांनी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे आणि आमदार संग्राम जगताप यांच्यावर जोरदार निशाणा साधला.

Pradeep Pendhare

Ahilyanagar Municipal Election : अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत सत्ताधाऱ्यांची दहशत, दडपशाहीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांचा तोफखाना चांगलाच धडाडला. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी सावेडीत घेण्यात आलेल्या सभेत खासदार लंके यांनी मंत्री विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांचे नाव न घेता दहशत, दडपशाहीवर जोरदार हल्लाबोल चढवला.

याचबरोबर महपौर महाविकास आघाडीचाच बसणार अन् तो ठरला असल्याचे सांगून चॅलेंज दिलं. याशिवाय माझ्या उमेदवारांना अन् कार्यकर्त्यांना खिंडत गाठल्यास नीलेश लंके बाह्या करून समोर उभा असेल, असे देखील ठणकावून सांगितले.

अहिल्यानगर महापालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेतृत्व खासदार नीलेश लंके करत आहे. महायुतीने प्रचारात त्यांचे स्टार नेते उतरले. पण महाविकास आघाडीची धुरा खासदार नीलेश लंके यांनी संभाळली. अहिल्यानगरच्या सावेडीच्या उपनगरात मविआच्या झालेल्या सभेत खासदार लंके यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्यावर त्यांचे नाव न घेत निशाणा साधला.

नीलेश लंके म्हणाले, "महाविकास आघाडीतील (MVA) उमेदवार सर्वसामान्य कुटुंबांतील आहे. ते नगरकरांचे सेवक म्हणून काम करणार आहेत. समोरून अनेक दबाव येत आहेत, अमिष दाखवली जात आहेत. पण या ऊत गेलेल्यांबरोबर नगरची जनता नाी, हे मला त्यांचेच नेते, कार्यकर्ते खासगीत येऊन सांगत आहेत. पोलिस पाठवतात, खोटे गुन्हे दाखल करतात, रामदास वाणी यांच्या घरी एकाचा पीए गेला, त्याच्या घरासमोर बाॅडीगार्ड पोलिस पिस्तूल घेऊन उभा होता. पण आमचा रामभाऊ साधा असला तरी, त्यांच्यासमोर हात देखील जोडले नाहीत, माग हटला नाही."

'दादागिरी, दहशत कोणी माझ्या उमेदवाराविरोधात केली, तर पहिला नीलेश लंके बाहेर काढायला लावू नका. राजकारण आम्ही सहनशीलतेने करतो, नम्रतेने करतो, जर माझ्या उमेदवाराला खिंडत आडून, दादागिरी, दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला ना, नीलेश लंकेशी गाठ आहे. दादागिरी घरी ठेवायची, नीलेश लंके बाह्यावर करून समोर येऊ शकतो. तुमच्यासारखा ऑफिसमध्ये बसून, आदेश करणार नाही. गुन्हे दाखल करणे, जेल वैगेरे आम्ही सर्व उकळून पिलो आहोत. पण जर गुंडांना पुढे करून माझ्या उमेदवारांना, कार्यकर्त्यांना दहशत निर्माण केल्यास माफ करणार नाही. निवडणुकीत जनतेचा काय कौल आहे, तो आम्हाला मान्य असेल,' असे नीलेश लंके यांनी ठणकावून सांगितले.

'उमेदवारांच्या मागे गुंड पाठवता. दादागिरी करायला मला शिकवू नका. तुम्ही काचेच्या घरात राहाता. आमच्यावर दगड हाणण्याचा प्रयत्न करू नका. मुख्यमंत्र्यांनी सभेत महापालिकेतील भ्रष्टाचारावर बोलणे अपेक्षित होते. पण सिस्पे घोटाळ्याची चौकशी करू, असे सांगून गेले. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन. सिस्पे घोटाळ्यात माझ्या गोरगरिब लोकांचे पैसे अडकले, तुम्ही आठ महिन्यांनी जागे झाले. आम्ही चौकशी लावल्यानंतर तुम्ही चौकशी लावल्याची भाषा करता,' असा टोला देखील नीलेश लंके यांनी लगावला.

लाडक्या पोराला खासदार करण्यासाठी...

'प्रवरा बँकेमध्ये रावसाहेब पटवर्धन पतसंस्था विलीन केली. ठेवीदारांचे पैसे तिथून मिळाले नाहीत. 2019 मध्ये लाडक्या पोराला खासदार करण्यासाठी माझ्या गोरगरिब लोकांना फसवलं तुम्ही. अन् तुम्ही माझ्यावर बोलता. आम्ही आज पण फाटके आहोत. फकीर आहोत. आमचा नाद करायचा नाही. राजकारण तर करायचंच नाही. मर्यादा ओलडल्यानंतर नीलेश लंकेशी वैर तुम्हाला परवडणार नाही. आम्हाला संस्था, कारखाने, संपत्ती टिकवायचे म्हणून राजकारण करत नाही. गोरगरिबांसाठी राजकारण करतो आम्ही,' असा इशारा नीलेश लंकेंनी दिला.

गडाखसाहेबांच्या बाबतीत जमलं

'अहिल्यानगरमध्ये अनेक घोटाळे झाले. शिर्डीमध्ये ग्रोमोअर कंपनीने हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला. ज्यांनी घोटाळा केला, ते कार्यकर्ते तुमच्या मागे-पुढे फिरतात. त्यावर बोललं पाहिजे. गुंडगिरी करणाऱ्यांचे तुम्ही समर्थन करता, साजूक गोष्टी करू नका. साहेब तुम्हाला विनंती आहे की, 2024च्या धक्क्यातून तुम्ही बाहेर पडा. लोकांनी मला दिलं निवडून. आता कोर्टातून खासदारकी घालवायची म्हणता. पण ते गडाखसाहेबांच्या बाबतीत जमलं. नीलेश लंके तुम्हा समाजण्याच्या हजारपट पुढं आहे,' असा टोला देखील नीलेश लंकेंनी लगावला.

माझाच महापौर बसणार

'मुख्यमंत्र्यांनी महापालिकेवर बोलायला पाहिजे होतं. 'फेज-टु'ची योजना अजून पूर्ण करता आलेली नाही. गाळेधारकांसाठी मनमानीपद्धतीने कर लावला. विरोधात गेला की, त्याच्या दारापुढे जेसीबी. आयुक्त त्यांचाच कार्यकर्ता. सर्व पक्षांतील नेत्यांना सांगणार आहे की, त्यांना उमेदवारी द्या. बापाची महापालिका आहे का? माझा महापौर बसू देत, अन् माझाच महापौर बसणार आहे, ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे,' असा विश्वास व्यक्त करत प्रशासकीय कामकाजावर नीलेश लंकेंनी रोष व्यक्त केला.

गुजरात्यांचे हिंदुत्व मान्य नाही...

'महापालिकेच्या माध्यमातून किती जणांना त्रास देणार आहे. खोटे गुन्हे दाखल करण्याबाबत रेकाॅर्ड ब्रेक आहे. अभिषेक कळमकर, दादाभाऊ कळमकर, किरण काळे यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले. पण आने वाले दिने बहुत अच्छे है, काळजी करू नका. खचून जाऊ नका. दहशत, दादागिरी करणाऱ्याचा थोडाच काळ असतो. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं सर्वसमावेशक हिंदुत्व आम्हाला मान्य आहे. पण जाती-भेद निर्माण करणारे, गुजरात्यांचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही,' असं देखील नीलेश लंकेंनी ठणकावून सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT