Ahilyanagar farmer debt death : कर्जपणाला कंटाळलेल्या अहिल्यानगर मधील नेवासा तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब सुभाष सरोदे (वय 44) यांनी विषारी औषध घेतल्याने मृत्यू झाला.
मृत्यूपूर्वी बाबासाहेब सरोदे यांनी तयार केलेल्या व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. नेवासा पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शेतकरी (Farmers) बाबासाहेब सरोदे यांनी रविवारी (ता. 17) विषारी औषध घेतले होते. यात त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांच्या मोबाईलमध्ये त्यांनी काढून ठेवलेला व्हिडिओ समोर आला. यात त्यांनी कर्जबाजारीपणा कंटाळून मृत्यूला कवटाळत असल्याचे म्हटले आहे. तसंच राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करत नाही, असा आरोप करताना, त्यांनी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांनी रचलेल्या रचनेतील 'धनवंतानी पिळले, धर्मांधांनी छळले, चोर झाले साव' या ओळींची आठवण करून दिली आहे.
बाबासाहेब सुभाष सरोदे हे अल्पभूधारक शेतकरी आहे. ते कर्जबाजारीपणाला कंटाळले होते. यातून त्यांनी शेतातच विषारी द्रव्य घेतले. मृत्यूपूर्वी या शेतकऱ्याने व्हिडिओ तयार केला. यात कर्जबाजारीपणासाठी त्यांनी आपल्या आत्महत्येसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारला (Maharashtra Government) जबाबदार ठरवले आहे.
बाबासाहेब सरोदे यांनी व्हिडिओमध्ये, 'मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे. मी सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवावर आजपर्यंत जीवंत होतो, कर्जमाफी होऊन मी कर्जमुक्त होईल, या आशेवर मी जगत होतो. दोनदा भाजप सरकार आले, देवेंद्र फडणवीस दोनदा मुख्यमंत्री झाले, त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही.'
'लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी रचेलेल्या, 'धनवंतानी पिळले, धर्मांधांनी छळले, चोर झाले साव', याप्रमाणे आज सरकार झाले आहे. या सरकारमध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी नाही तर, इंडस्ट्रियलसाठी आहे. सरकारच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच नाही. म्हणून माझ्यावर आत्महत्या करायची वेळ येत आहे,' असे सरोदे यांनी म्हटले आहे.
'योग्य वेळी सरकारकडून मला मदत झाली असती, तर मी नक्कीच आयुष्य पुढे जगलो असतो. परंतु कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिळवणूक होत आहे. म्हणून मी हा निर्णय घेत आहे. मी मेल्यावर तरी माझ्या कुटुंबियांना मदत व्हावी,' असेही सरोदे यांनी व्हिडिओमध्ये म्हटलेले आहे. आत्महत्या केलेले शेतकरी बाबासाहेब सरोदे यांच्यापश्चात आई नंदाबाई, पत्नी अर्चना, मुलगी किरण, मुलगा सुरज व रोशन असा परिवार आहे.
दरम्यान, कीटकनाशक प्राशन केल्याने शेतकऱ्याचा मृत्यू झाला. चंद्रपूर जिल्हातील गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या अडेगावात इथं ही घटना घडली. गणपत भाऊजी नागापुरे, असे या शेतकऱ्याचे नाव आहे. नागापुरे यांच्याकडे तीन एकर शेती आहे. दरवर्षी अतिवृष्टी आणि पुरामुळे त्यांच्या शेतीचे मोठे नुकसान होत असे. यावर्षी त्यांनी तीन एकरमध्ये कापूस, धान पेरले आणि वर्धा नदीला आलेल्या पुरामुळे त्यांची पूर्ण शेती पाण्याखाली आली. अद्यापही त्यांची शेती पाण्याखाली आहे. मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतीचे डोळ्यादेखत नुकसान होताना बघणे असाह्य झाल्याने शेतात जाऊन कीटकनाशक घेतले. शेतकऱ्यांचा सण मानल्या जाणाऱ्या पोळ्याच्या पूर्वसंध्येलाच घडलेल्या या घटनेने परिसरावर शोककळा पसरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.