Gold investment scam Maharashtra : अहिल्यानगर पोलिसांनी मोठी कारवाई करत रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी अविनाश नलावडे यांची 52 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील पाच आरोपींना अटक केली आहे.
तब्बल 14 जणांच्या टोळीने स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवत ही धाडसी लूट केली होती. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नांदेड जिल्ह्यात जाऊन शिताफीने ही कारवाई केली.
शिवसेनेचे (Shivsena) अविनाश नलावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना स्वस्त दरात सोने मिळवून देण्याचे आमिष दाखवत नगर तालुक्यात बोलावण्यात आले होते. गुरुवारी (4 जून) सायंकाळी सुमारे 7 वाजता आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन करून तब्बल 52 लाख 80 हजार रुपयांची रक्कम लंपास केली.
विशेष म्हणजे या टोळीतील काही आरोपी यापूर्वी नलावडे यांच्या संपर्कात असून त्यांच्याकडे कामालाही होते. त्यामुळे विश्वासाचा फायदा घेत हा कट रचण्यात आला. या प्रकरणी नगर तालुका पोलिस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नगर तालुका पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला.
तपासादरम्यान टोळीतील प्रमुख आरोपी नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील झेंडीगुळा लोणी गावात लपून बसल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळाली. दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन कारवाई करायची असल्याने काही तांत्रिक अडचणी होत्या. मात्र, पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी आवश्यक परवानग्या आणि नियोजन करून कारवाईला हिरवा कंदील दिला. यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने थेट नांदेडमध्ये धाड टाकून आरोपींना त्यांच्या घरातून ताब्यात घेतले.
शिवाजी विठ्ठल मोहिते उर्फ शिवा (रा. झेंडीगुळा लोणी, ता. किनवट, जि. नांदेड), राजू रामदास मोहिते उर्फ चंदू (रा. झेंडीगुळा लोणी, ता. किनवट, जि. नांदेड), अक्षय रामदास मोहिते उर्फ आकाश (रा. मालठा, ता. हदगाव, जि. नांदेड), छगन दशरथ मोहिते (रा. याडी, ता. नेर, जि. यवतमाळ), दिनेश सुदाम जाधव (रा. दगडवाडी, ता. हदगाव, जि. नांदेड) चौकशीत या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये 16 लाख 50 हजार रुपयांची रोख रक्कम, 1 लाख 90 हजार रुपयांचे दागिने, 8 लाख रुपयांची कार, बनावट सोन्याची नाणी,कोयता, असा एकूण 26 लाख 52 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या प्रकरणातील पाचही आरोपींना पुढील तपासासाठी नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. दरम्यान, 14 जणांच्या टोळीतील उर्वरित आरोपींचा शोध सुरू असून लवकरच आणखी अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.