Mahayuti government meeting Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Mahayuti Government Meeting : महायुती सरकारची चौंडीत होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीवर 15 कोटींचा खर्च

Mahayuti Government Faces Heat Over ₹15 Crore Cabinet Meeting in Chondi : महायुती राज्य सरकारची जामखेडमधील चौंडी इथं होणाऱ्या बैठकीची अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे.

Pradeep Pendhare

Ahilyanagar District Administration : महाराष्ट्र स्थापनेच्या तब्बल 65 वर्षानंतर राज्य सरकारची मुंबई आणि नागपूर बाहेर मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या जन्मगावी 29 एप्रिलला चौंडी (ता. जामखेड) या बैठकीची आयोजन केलं आहे.

अहिल्यानगर जिल्हा प्रशासनाकडून या बैठकीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत जोरदार तयारी सुरू असून, यासाठी तब्बल 15 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. यात मंडप उभारणीचाच खर्च दीड कोटींवर आहे.

महाराष्ट्र (Maharashtra) राज्य मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीसाठी चौंडी इथं मुख्य मंडप उभारणे, स्टेज बांधणे, ग्रीन रुम्स, प्रसाधनगृह, बॅरिकेटींगसह इतर आनुषंगिक कामे करणे, तसेच साईड मंडप तयार करणे या कामांसाठी दहा कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे.

विद्युतीकरण, ध्वनिक्षेपण, वातानुकूलीन यंत्रणा, विद्युत जनित्र, सीसीटीव्ही व्यवस्था, अग्निशमन यंत्रणा व इतर गोष्टींसाठी पाच कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. या कामाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागावर असून, हे सर्व काम 28 एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जिल्हा प्रशासनाचे ऐनवेळेच्या सूचनेनुसार व कामाचे वस्तुनिष्ठ आवश्यकतेनुसार सर्वंकषपणे काम पूर्ण करण्यात येणार आहे.

दरम्यान, 16 एप्रिलला मुंबईत विधानभवनात विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) आणि राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यामध्ये राज्य मंत्रिमंडळाच्या नियोजित बैठकीबरोबरच चौंडी विकास आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले होते.

यानंतर 18 एप्रिलला नाशिक विभागीय महसूल आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भरतकुमार बाविस्कर यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांनी चौंडी इथं भेट देत, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचा पूर्वतयारीचा आढावा घेतला.

700 कोटींचा चौंडी विकास आराखडा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे जन्मगाव चौंडी इथं विविध विकास कामे प्रस्तावित असून, हा विकास आराखडा तब्बल 700 कोटी रूपयांचा तयार करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी मिळू शकते.

70 एकर जमिनीवर स्मारक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा साधारण 108 फुट उंचीचा पुर्णाकृती पुतळा सीना नदीपात्रातील नैसर्गिक बेटावर उभारला जाणार आहे. त्यामध्ये अहिल्यादेवींचे जडणघडण दर्शवणारे आठ महत्वाचे टप्पे असलेले समूह शिल्प पुतळ्यालगत उभारले जाणार आहेत.

चौंडीलगत सीना नदीपात्रात 350 मीटर लांब आणि 40 मीटर रूंदीचे नैसर्गिक बेट असून, त्यावरच हा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. नियोजित पुतळ्यासमोरील नदी पात्रालगत असलेल्या एकूण 70 एकर जमिनीवर स्मारक होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT