Ahilyanagar Savedi woman shooting news : फ्लॅटमध्ये घुसून महिलेवर गोळीबार करणाऱ्या तरुणाने पुढे स्वतः डोक्यात गोळी झाडून घेतली. यात योगेश सोमनाथ डोंगरे (रा. झारेकर गल्ली, नालेगाव) याचा मृत्यू झाला.
अहिल्यानगर शहरातील सावेडीतील उच्चभ्रू उपनगरातील एकवीरा चौकातील शिवनगरमध्ये शुक्रवारी ही घटना घडली. ही घटना कोणत्या कारणातून घडली याचा तपास तोफखाना पोलिस करत असून, प्राथमिक तपासात 'वेगळाच' अँगल समोर येत आहे.
अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील सावेडीतील एकवीरा चौक ते निर्मलनगर रस्त्यावर शिवनगर हे नव्याने विकसित झालेले उपनगर आहे. या ठिकाणी अनेक अपार्टमेंटची बांधकामे झालेली आहेत. योगेश डोंगरे हा एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या महिलेच्या घरात दुपारी घुसला. त्याने या महिलेवर गावठी पिस्तुलातून दुपारी गोळीबार केला.
या गोळीबार संबंधित महिला गंभीर जखमी झाली. या गोळीबारानंतर (Firing) त्याने तेथून पळ काढला. शेजारी रहिवाशांनी ही माहिती महिलेच्या कुटुंबीयांना दिली. या महिलेला उपचारासाठी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले. अतिरिक्त पोलिस अधीक्षक वैभव कलबुर्गे, शहर विभागाचे पोलिस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, पोलिस निरीक्षक बालाजी वैद्य यांनी घटनास्थळी भेट दिली. न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेच्या पथकालाही पाचारण करण्यात आले.
दरम्यान, अहिल्यानगर-आगडगाव रस्त्यावरील कापूरवाडी (ता. नगर) शिवारातील घाटातील मायंबा मंदिराजवळ एका तरुणाने सायंकाळी स्वतःवर गोळी झाडून घेतल्याची माहिती भिंगार कॅम्प पोलिसांना मिळाली. सहायक निरीक्षक तेजश्री थोरात यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चौकशी केल्यावर मयत तरूण हा योगेश डोंगरे असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले.
योगेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात रात्री आणण्यात आला. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी महिलेच्या नातेवाइकांनी गर्दी केली होती. महिलेवरील गोळीबार प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.