

Ahilyanagar Political News : अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीत 11 जागा बिनविरोध झाल्या आहेत. दहा जागांसाठी 27 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके एकटे पडल्याचे चित्र आहे.
भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील-काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहमीत एक्सप्रेसमध्ये विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनाही कुठेतरी दिलासा मिळाला. खासदार लंकेंच्या सहकार परिवर्तन पॅनलला मंत्री विखे पाटील-थोरात सहमती एक्सप्रेसच्या सहकार विकास पॅनलबरोबरच राम शिंदेंच्या स्वतंत्र पॅनलशी लढा द्यायचा आहे. खासदार लंके यांच्या जिल्हा बँकेच्या लढतीत, एकनाथ शिंदे शिवसेनेचे बळ मिळाले असले, तरी ते कितपत यशस्वी होणार याकडे लक्ष लागले आहे. त्यामुळे ही निवडणूक आगामी काळात जिल्ह्याच्या राजकारणावर आगामी वेगळा प्रभाव पडण्याची चिन्हे आहेत.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या (DCC Bank) निवडणुकीतील दहा जागांच्या निवडणुकीत काही जागांवर दोन्ही राष्ट्रवादी, तर भाजपविरुद्ध भाजप, असा सामना होणार आहे. पारनेर सेवा सोसायटी मतदारसंघात खासदार नीलेश लंके यांच्याविरोधात राहुल शिंदे मैदानात आहेत. लंके यांच्याविरोधात सहाजिकच शिंदेंना मंत्री विखे पाटील-थोरात यांच्या सहमती एक्सप्रेसचे बळ असणार आहे.
तसेच महानगर बँकेच्या गीतांजली शेळके यांचा या मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. त्यांची भूमिका येथे निर्णायक ठरणार आहे. शेळके कुटुंबियांवर शरद पवार (Sharad Pawar) यांचा प्रभाव सर्वश्रुत आहे. तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीपूर्वी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे गीतांजली येथे महायुतीचा धर्म पाळता की, खासदार लंकेंना बळ देतात याकडे लक्ष लागले आहे.
शेतीपूरक मतदारसंघातून अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे आमदार आशुतोष काळे रिंगणात आहेत. त्यांच्याविरोधात 27 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. शेवटच्या दिवशी 26 उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर काळे यांच्याविरोधात एकमेव सुधीर रावसाहेब म्हस्के यांची उमेदवारी राहिली. म्हस्के यांची माघार होऊन काळे बिनविरोध होणार, असे सांगितले जात होते.
परंतु, खासदार नीलेश लंके यांनी ऐनवेळी म्हस्के यांना बळ देत आमदार काळे यांना धक्का दिला. आमदार काळे यांची मंत्री विखे पाटील यांच्या नेतृत्वात वाटचाल सुरू आहे. खासदार लंकेंना पारनेरमध्ये मंत्री विखे पाटील यांनी घेरल्याचे दिसताच, खासदार लंकेंनी विखे पाटील समर्थक म्हणून, आमदार काळेंविरोधात उमेदवार केल्याचे सांगितले जात आहे.
राहुरी सोसायटी मतदारसंघात भाजप विधान परिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरेंविरोधात देवळाली प्रवरा नगरपालिकेतील भाजपचे नगराध्यक्ष सत्यजीत कदम यांच्यात थेट लढत होणार आहे. प्राजक्त तनपुरेंविरोधात लढाईत सत्यजीत कदम कोणाचे बळ मिळवण्यात यश मिळतात, याकडे देखील लक्ष लागले आहे.
सहकारातील विखे पाटील-थोरात एक्स्प्रेसला रोखण्यासाठी सभापती शिंदे यांनी विरोधी पक्षात असलेल्या खासदार नीलेश लंके यांच्यासोबत बैठक केली. शिंदे व लंके एकत्र असल्याने विरोधकांच्या, आशा पल्लवित झाल्या. मात्र, ऐनवेळी विखे पाटील-थोरात यांनी शिंदे यांची जामखेडची जागा बिनविरोध करीत त्यांची कोंडी केली. त्यामुळे शिंदे यांच्या उर्वरित तीन उमेदवारांना अपक्ष निवडणूक लढवावी लागत असून, लंके यांनी स्वतंत्र पॅनल केले. त्यामुळे लंके हे एकाकी पडल्याचे चित्र आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.