Maharashtra farmer assault : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हादरवून सोडणारी घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात समोर आली आहे. गोवंश घेऊन जाणाऱ्या शेतकरी आणि टेम्पोचालकाला रस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आली.
त्यानंतर दोघांचे कपडे काढून बाटलीत लघुशंका करून ती जबरदस्तीने पाजल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकाराचे मोबाईलमध्ये चित्रीकरणही केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी शेतकरी (Farmer) विजय शेळके (रा. गुणवडी, ता. श्रीगोंदा) यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी गोरक्षक प्रतिक पाचपुते याच्यासह सुमारे 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रतिक पाचपुते हा आद्यगोरक्षक श्री शिवछत्रपती गोरक्षा समितीचा अहिल्यानगर जिल्हाप्रमुख असल्याची माहिती समोर आली आहे. या पदाबाबत संबंधित संस्थेची अधिकृत पुष्टी स्वतंत्रपणे झालेली नाही.
फिर्यादीनुसार, विजय शेळके यांनी टाकळी लोणार येथून एक गावरान गाय आणि तिचे कालवड 14 हजार रुपयांना खरेदी केले होते. हे गोवंश महेश जाधव यांच्या टेम्पोतून घरी घेऊन जात असताना (Shrigonda) टाकळी लोणार-पिसोरे खांड रस्त्यावर त्यांचा टेम्पो अडवण्यात आला. काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी टेम्पो थांबवून गाय आणि पैशांची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी लाकडी काठी आणि लोखंडी गजाने मारहाण केल्याचा आरोप आहे.
विजय शेळके यांनी विरोध केल्यानंतर संबंधितांनी फोन करून इतर साथीदारांना बोलावले. काही वेळात विनानंबरच्या वाहनांमधून तसेच दुचाकींवरून आणखी काही जण घटनास्थळी आल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या टोळक्याने विजय शेळके आणि महेश जाधव यांना मारहाण केल्याचा आरोप आहे. त्यांच्याकडून 50 हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे देण्यास विरोध केल्यानंतर शेळके यांच्या खिशातून 21 हजार रुपये बळजबरीने काढून घेतल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे.
मारहाणीनंतर दोघांचे कपडे काढण्यात आले. त्यानंतर पाण्याच्या बाटलीत लघुशंका करून ती दोघांना जबरदस्तीने पाजल्याचा गंभीर आरोप विजय शेळके यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकाराचे काही आरोपींनी मोबाईलमध्ये चित्रीकरण केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. घटनेनंतर जखमी विजय शेळके आणि महेश जाधव यांना उपचारासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विजय शेळके यांनी मारहाण करणाऱ्यांपैकी प्रतिक पाचपुते याला ओळखल्याचे पोलिसांना सांगितले. पाचपुते सोशल मीडियावर रील्स शेअर करत असल्याने त्याला त्यातून ओळखल्याचे शेळके यांनी फिर्यादीत म्हटले आहे. लघुशंका पाजण्याची जबरदस्ती आणि 50 हजार रुपयांची मागणी प्रतिक पाचपुते यानेच केल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रतिक पाचपुते याच्यासह अन्य 15 जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपींवरील आरोपांची न्यायालयीन प्रक्रिया अद्याप बाकी आहे.
श्रीगोंद्यातील या घटनेवरून राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातूनही प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कारवाईची मागणी केली आहे. गोरक्षणाच्या नावाखाली स्वयंघोषित गोरक्षकांकडून शेतकऱ्यांचा छळ सुरू आहे, असा आरोप लवांडे यांनी केला. जालन्यातील घटनेनंतर आता श्रीगोंदा तालुक्यातील प्रकार समोर आला असून, राज्यात कायदा आहे की नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. गोरक्षणाच्या नावाखाली कायदा हातात घेण्याच्या प्रकारांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही लवांडे यांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.