Ahilyanagar farmers protest : आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या प्रश्नावरून श्रीरामपूरमध्ये सुरू करण्यात आलेल्या जेलभरो आंदोलनानं शहर ढवळून निघालं आहे. प्रशासनाने पाठवलेले आश्वासनाचे पत्र फेटाळून लावत संतप्त शेतकऱ्यांनी त्याची होळी केली अन् थेट पोलिस ठाण्याच्या दारासमोर चुली पेटवून सरकारचा निषेध केला.
"हिंमत असेल तर गुन्हे दाखल करा, आम्ही आता हटणार नाही," अशा शब्दांत शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजित काळे यांनी राज्य सरकारला ललकारलं, तर प्रशासनाला देखील ठणकावलं.
आंदोलन सुरू असताना राज्य सरकारचे (Government) सहसचिव सत्यनारायण बजाज यांचे पत्र प्रशासनामार्फत आंदोलकांना प्राप्त झाले. या पत्रात नमूद होते की, हरेगाव मळ्यातील चार हजार एकर क्षेत्र एका खासगी कंपनीच्या प्रकल्पासाठी हस्तांतरित करण्याबाबत महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती गठीत करण्यात आली आहे. या उपसमितीच्या आगामी बैठकीत नऊ गावांतील आकारी पडीत जमिनींच्या विषयावर चर्चा होईल, तोपर्यंत शेतकऱ्यांनी आंदोलनापासून परावृत्त व्हावे.
हे पत्र वाचताच आंदोलक शेतकऱ्यांमध्ये (Farmer) संतापाची लाट उसळली. आमच्या जमिनी खासगी कंपन्यांच्या प्रकल्पासाठी देण्याचे कारस्थान रचले जात आहे, असा आरोप करत आंदोलक शेतकऱ्यांनी सरकारच्या पत्राची होळी केली. आंदोलनाचे गांभीर्य अधोरेखित करण्यासाठी महिला आंदोलकांनी पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच संसार थाटला. भर उन्हात चुली पेटवून प्रत्यक्ष स्वयंपाक सुरू केला.
या आंदोलनात महिलांसबोत त्यांची चिमुकली मुलं होती. जमिनीचा ताबा मिळत नाही, तोपर्यंत हे पोलिस ठाणेच आमचे घर आहे, असा पवित्रा महिलांनी घेतला. यावेळी बनविण्यात आलेले पिठले भाकरी आंदोलनकर्त्यांनी खाल्ले. या अनोख्या आंदोलनानं पोलिस प्रशासनाची मोठी कोंडी केली.
या आंदोलनामुळे श्रीरामपूर शहर पोलिस ठाणे परिसराला छावणीचे स्वरूप आले होते. आकारी पडीत जमिनींचा प्रश्न आता धगधगत्या ज्वालामुखीसारखा पेटला आहे. प्रशासनाकडून अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही.
ॲड. अजित काळे आंदोलनात खूपच आक्रमक झाले होते. ते म्हणाले, "सरकार जर अशा पद्धतीने वागत असेल, तर महात्मा गांधींनी दिलेला अहिंसेचा मार्ग आज इथंच संपतो आहे. सरकारला काय वाटते, आम्ही तोडफोड करू शकत नाही का? आमच्यात दम नाही का? आम्ही स्वतःहून तुमच्या दारात आलो आहोत, हिंमत असेल, तर अटक करा आणि गुन्हे दाखल करा."
आंदोलकांनी स्पष्ट केले की, "आज सायंकाळपर्यंत आंदोलकांची संख्या 20 हजारांच्या पार जाईल. या ठिकाणी आलेला प्रत्येक माणूस आज 'अटक' झाला आहे, असे समजा. आता आमची राहण्याची आणि खाण्यापिण्याची सर्व जबाबदारी सरकारची आहे," असे ठणकावून सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.