Prakash Chitte Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

RSS BJP leader joins Shivsena : एकनाथ शिंदेंनी टिपला मोठा 'मोहरा'; भाजपचं नगरपालिकाचं गणित बिघडवलं!

Prakash Chitte from RSS-BJP joins Eknath Shinde Shivsena : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आणि भाजपचे श्रीरामपूरमधील कट्टर कार्यकर्ते प्रकाश चित्ते यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला.

Pradeep Pendhare

Ahilyanagar political news : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कट्टर हिंदुत्ववादी स्थानिक नेते प्रकाश चित्ते यांनी भाजपचा हात सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. ठाणे इथं हा प्रवेश कार्यक्रम झाला. अहिल्यानगरसह नाशिक जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला.

प्रकाश चित्ते भाजपच्या प्रदेश ओबीसी सेलचे माजी उपाध्यक्ष आहेत. भाजपच्या पक्ष संघटनेतील निलंबनानंतर त्यांनी पक्ष नेतृत्वाशी भेट घेऊन खदखद सांगितली. या तक्रारींची दखल घेण्याअगोदर, त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला. प्रकाश चित्ते यांच्यासह त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी हा पक्ष प्रवेश केला. श्रीरामपूरमध्ये लवकर एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित मेळाव्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

प्रकाश चित्ते नुकताच मुंबईत भाजप (BJP) मंत्री गिरीश महाजन यांना भेटून आले होते. लवकरच, तोडगा निघेल आणि पक्षात संधी मिळेल, अशी चर्चा होती. परंतु पक्षाकडून कोणत्याही संदेशाची वाट न बघता, प्रकाश चित्ते यांनी आज ठाणे इथं एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेना पक्षात प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांना अहिल्यानगरच्या उत्तरमध्ये प्रकाश चित्ते यांच्या रुपाने कट्टर हिंदुत्वावादी, अन् ओबीसी चेहरा मिळाला आहे. विशेष म्हणजे, हा चेहरा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी देखील निगडीत आहे.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याशी काल रात्री बैठकांवर बैठका झाल्या. निर्णय प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रकाश चित्ते यांनी श्रीरामपूरमधील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तालुका संपर्कप्रमुख जनार्दन गालपगार, सुनील मुथा, माजी नगरसेवक किरण लुनिया, संजय पांडे आणि राजेंद्र कांबळे या बैठकीला उपस्थित होते. यानंतर पक्ष प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला. प्रकाश चित्ते यांच्या यांनी घेतलेला हा निर्णय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का असल्याचं मानलं जात आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीनंतर श्रीरामपूरची राजकीय गणित बदलली आहेत. माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा स्वतंत्र पॅनल उभा करणार असल्याची अधिकृत हालचाल सुरू आहेत. भाजपशी कोणताही तडजोडीचा मोह न ठेवता "स्वतःचे पॅनल – स्वतःचा नगराध्यक्ष" या धाटणीने तयारी सुरू आहे. त्यामुळे प्रकाश चित्ते यांचा हा पक्ष प्रवेश शिवसेनेसाठी महत्त्वाचा मानला जातो आहे.

प्रकाश चित्ते हिंदुत्वाचा चेहरा?

प्रकाश चित्ते ओबीसी मतदारांवर त्यांचा प्रभाव आणि हिंदुत्ववादी गटांत मजबूत पकड आहे. परंतु, गेल्या निवडणुकीनंतर श्रीराम सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष सागर बेग एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात दाखल झाले होते. पण बेग आणि प्रकाश चित्ते यांच्यातील जुना संघर्ष सर्वश्रुत आहे. हिंदुत्वाच्या गोटात या दोघांची शत्रुत्वाची रेषा कायम असल्याने पॅनलच्या घडामोडींना पेच निर्माण झाला आहे. तसंच नगराध्यक्षपदासाठी थेट टक्कर भाजपविरुद्ध एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात होण्याची सर्वाधिक शक्यता आहे.

महायुतीत 'सामना' होणार

भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी श्रीरामपूरमधील काँग्रेसचे दहा माजी नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश घडवून आणला आहे. तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीत देखील बरीच गणित फिरली गेली आहे. मंत्री विखे पाटीलविरुद्ध इतर असा संघर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी होण्याची चिन्हं आहेत. प्रकाश चित्ते यांचा शिवसेना पक्ष प्रवेशाने स्थानिकमध्ये अधिक रंगत येणार असल्याची चिन्हं असून, महायुतीतच नगराध्यक्षपदासाठी सामना रंगणार, अशी चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT