hilyanagar MLC Election : अहमदनगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत दाखल झालेल्या पाचही उमेदवारांचे अर्ज मंगळवारी (2 जून) वैध ठरले. आता 4 जून रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असल्याने कोण माघार घेणार आणि अंतिम लढत किती उमेदवारांमध्ये होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, छाननीनंतर काँग्रेसचे श्रीरामपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष करण ससाणे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दत्तात्रय पानसरे हे दोन्ही प्रतिस्पर्धी उमेदवार जिल्हाधिकारी कार्यालयातून एकाच वाहनातून बाहेर पडल्याचे दिसून आले. या एकत्रित प्रवासामुळे जिल्ह्यात नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे. ससाणे आणि पानसरे यांनी या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे.
यावेळी दत्तात्रय पानसरे यांनी मिश्किल प्रतिक्रिया देताना, 4 जूनपर्यंत कोण काय म्हणेल ते म्हणू द्या, आम्ही एकत्रच प्रवास करणार. निवडणुकीत काय होईल ते पाहू, असे सांगितले. तर करण ससाणे यांनी केवळ स्मितहास्य करत वाहनाचे सारथ्य केले. त्यामुळे राजकीयदृष्ट्या वेगवेगळ्या वाटांवर असलेल्या या दोन नेत्यांचा प्रवास मात्र एकाच दिशेने असल्याचा सूचक संदेश दिला गेला का, अशी चर्चा सुरू झाली आहे.
रिंगणात नेमके कोण?
भाजपचे उमेदवार व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे, काँग्रेसचे श्रीरामपूर नगराध्यक्ष करण ससाणे (अपक्ष अर्ज), अजित पवार राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय पानसरे (अपक्ष अर्ज), कमलेश हस्तीमल गांधी (शेवगाव), मच्छिंद्र पांडुरंग धुमाळ (राहुरी) यापैकी कोण उमेदवारी मागे घेणार आणि अंतिम लढतीत किती उमेदवार राहणार, हे 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे.
बिनविरोध होण्याची शक्यता
काही राजकीय वर्तुळांमध्ये ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. निवडणूक प्रक्रियेअंतर्गत आज सर्व अर्जांची छाननी करण्यात आली. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे आणि पात्रतेचे सर्व निकष पूर्ण केल्याचे आढळून आल्याने पाचही अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यामुळे सध्या कोणताही उमेदवार अपात्र ठरलेला नाही.
4 जूनकडे साऱ्यांचे लक्ष
अर्ज छाननीनंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट झाले असले तरी खरी उत्सुकता आता 4 जूनची आहे. उमेदवारी माघारीच्या शेवटच्या दिवशी कोण मैदानातून बाहेर पडणार, महाविकास आघाडी आणि महायुतीचे अंतिम राजकीय गणित काय ठरणार, तसेच निवडणूक बिनविरोध होणार की थेट लढत रंगणार, याचे उत्तर त्याच दिवशी मिळणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.