Karan Sasane Congress Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Congress vs Prajakt Tanpure Battle : महायुतीच्या प्राजक्त तनपुरे गणितात काँग्रेसचा ट्विस्ट! ‘करण ससाणे फॉर्म्युला’मुळे विधान परिषदेत वाढली उत्सुकता

Congress likely field Karan Sasane Ahmednagar Local Authorities MLC election political battle against Prajakt Tanpure intensifies : श्रीरामपूर नगरपरिषदेचे काँग्रेसचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी विधान परिषदेचा पहिला अपक्ष अर्ज दाखल केला असला, तरी संभाव्य भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरेविरुद्ध काँग्रेसचा उमेदवार कोण, याकडे लक्ष असणार आहे.

Pradeep Pendhare

Maharashtra Legislative Council Election : अहमदनगर स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राजकीय हालचालींना मोठा वेग आला आहे. श्रीरामपूर नगरपरिषदेचे काँग्रेसचे नगराध्यक्ष करण ससाणे यांनी अपक्ष म्हणून पहिला उमेदवारी अर्ज दाखल करत निवडणुकीच्या मैदानात जोरदार एन्ट्री केली आहे.

त्याचवेळी महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला जाणं जवळपास निश्चित झाल्याने पुढील काही तासांत काँग्रेसचा अधिकृत उमेदवार कोण असेल, यावर शिक्कामोर्तब होणार आहे.

राज्यातील 17 विधान परिषद जागांच्या निवडणुका (MLC Election) पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला असून, अहमदनगरची जागा काँग्रेसकडे जाणार असल्याचं स्पष्ट संकेत मिळत आहेत. दुसरीकडे महायुतीकडून भाजपचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. त्यामुळे अहिल्यानगरच्या राजकारणात तनपुरेविरुद्ध काँग्रेस, अशी थेट लढत रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काँग्रेसकडून (Congress) उमेदवार कोण, याबाबत उत्सुकता असतानाच करण ससाणे यांनी अपक्ष अर्ज दाखल करून राजकीय चर्चांना उधाण आणलं आहे. पक्षांतर्गत सूत्रांनुसार काँग्रेसकडून त्यांचंच नाव आघाडीवर असल्याचं मानलं जात आहे. मात्र या निवडणुकीतील खरी कसोटी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची असणार आहे.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचं स्पष्ट जाहीर केलं आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्थानिक नेतृत्वावर जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या असून, अहिल्यानगर जिल्ह्याची संपूर्ण सूत्रं बाळासाहेब थोरात यांच्या हातात असणार आहेत.

राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यानही काँग्रेसकडून स्वतंत्र तयारी सुरू होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून उमेदवारी निश्चित होत नसताना काँग्रेसने पर्यायांवर चाचपणी केली होती. त्यावेळी बाळासाहेब थोरात यांनी स्वतः अहिल्यानगरमध्ये येऊन स्थानिक पातळीवर हालचाली सुरू केल्या होत्या. योग्य उमेदवार मैदानात असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता. आता विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर थोरातांवरच सर्वाधिक राजकीय जबाबदारी येणार आहे.

करण ससाणे यांना उमेदवारी मिळाल्यास त्यांच्याकडे राजकीय वारशासोबत निवडणुकीचा अनुभवही मोठी ताकद ठरणार आहे. त्यांचे दिवंगत वडील आणि माजी आमदार जयंत ससाणे यांनी याच विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अरुण जगताप यांच्याविरोधात जोरदार लढत दिली होती. त्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी संपूर्ण राज्याचं लक्ष त्या सामन्याकडे लागलं होतं.

त्याच अनुभवाच्या जोरावर करण ससाणे मैदानात उतरल्यास महायुतीसमोर कठीण आव्हान उभं राहू शकतं. दुसरीकडे जिल्ह्यातील मतांची प्रभावी मोट बांधण्यात बाळासाहेब थोरात यांचा हातखंडा मानला जातो. त्यामुळे खासदार नीलेश लंके, खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि महाविकास आघाडीतील इतर नेते थोरातांच्या पाठीशी कितपत एकजूट दाखवतात, याकडेही आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT