Ahmednagar Politics Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar Politics: विखेंकडून 600 गावांत साखरपेरणी; 21 लाख लाडूंचा नैवेद्य

Sujay Vikhe Patil : भाजपचे खासदार सुजय विखे यांनी मतदारसंघातील 600 गावांपर्यंत साखर वाटपाचा कार्यक्रम सुरु केला आहे.

Pradeep Pendhare

Ahmednagar News: अयोध्येत प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठेचा सोहळा जसा जवळ येऊ लागला आहे, तशी भाजपमध्ये कार्यक्रमांची लगबग वाढली आहे. नगर दक्षिण लकोसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार सुजय विखे यांच्या साखर, डाळ वाटप कार्यक्रमाला वेग येऊ लागला आहे. खासदार विखेंची साखर आणि डाळ तब्बल 600 गावांपर्यंत पोहोचली आहे.

प्रभू श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी 22 जानेवारीला साखर आणि डाळीतून लाडू तयार करून प्रत्येकी दोन लाडू गावातील मंदिरात प्रसाद म्हणून ठेवण्याचे आवाहन खासदार विखेंनी केले आहे. यातून 21 लाख लाडू प्रसाद तयार होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात नगर शहर आणि आठ तालुके येतात. यात आठ तालुक्यांमध्ये 907 गावे आहेत. नगर शहरासह आठ तालुक्यांमध्ये सुमारे साडेसहा लाख कुपन धारक आहेत. त्यातील खासदार विखेंची यंत्रणा आतापर्यंत 600 गावांपर्यंत साखर आणि डाळ घेऊन पोहोचली आहे. यात चार किलो साखर, एक किलो डाळ आणि दिनदर्शिकेचा समावेश आहे.

साडेसहा लाख कुपनधारकांना प्रत्येकी चार किलो साखर धरल्यास ती 26 लाख किलो होते. एक किलो डाळ धरल्यास साडेसहा लाख किलो होते. नऊ डिसेंबरपासून साखर आणि डाळ वाटपाचा कार्यक्रम सुरू आहे. एका दिवसात आठ ठिकाणी साखर आणि डाळ वाटपाचा कार्यक्रम खासदार विखे यांच्या यंत्रणेकडून होतात. हा कार्यक्रम 31 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खासदार विखे यांनी साखर आणि डाळ वाटप करताना लाभार्थ्यांना प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी सोमवारी (ता. 22) प्रसाद म्हणून दोन लाडू स्थानिक धार्मिक स्थळी ठेवण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद मिळेल, असा दावा विखे यंत्रणेकडून करण्यात आला आहे. यानुसार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील 600 गावांमधील धार्मिक स्थळांमध्ये 21 लाखापर्यंत लाडवांचा प्रसाद दाखवला जाईल, असा दावा केला जात आहे.

नियोजन कसे केले जाते ?

खासदार सुजय विखे यांच्या यंत्रणेकडून ज्या गावात साखर आणि डाळ वाटायची आहे. तिथे त्यांची यंत्रणा आणि भाजप कार्यकर्ते अगोदर पोहोचतात. तिथे कुपनधारकांची नोंद करून घेऊन टोकन दिले जाते. यानंतर वेळ निश्चित केली जाते. तसे गावकऱ्यांना सुचित केले जाते. कार्यक्रमस्थळी वाहने पोहोचतात. तिथे बॅरिकेट लावून वाहने उभी केली जातात. रांगेनुसार टोकन घेऊन साखर आणि डाळ वाटली जाते. हा कार्यक्रम एका दिवसात नऊ ठिकाणी घेतला जातो. सकाळी आठ वाजल्यापासून साखर आणि डाळ वाटपाला सुरूवात केली जाते.

हजारो जणांना रोजगार

साखर, डाळ आणि दिनदर्शिक याची एकत्र बॅग तयार केली जाते. ही बॅग पॅक करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून सुमारे चारशे महिला कार्यरत आहेत. तसेच गोडावूनमधून या बॅग घेऊन कार्यक्रमस्थळी पोहोचण्यापर्यंत वाहनासह इतर सर्व यंत्रणा कार्यरत आहे. तसेच बॅग देखील छापून घेण्यात आल्या आहे. यातून हजारो जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ही सर्व साखर आणि डाळ वाटप जनसेवा फाऊंडेशनमार्फत सुरू आहे.

साखर वाटपाला राजकीय किनार ?

राहाता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्यात दिवाळीनिमित्त विखे परिवाराकडून साखर वाटण्यात आली. यानंतर शिर्डी विधानसभा मतदारसंघात देखील साखर वाटपण्यात आली. या कार्यक्रमासाठी खासदार सुजय विखे यांनी पुढाकार घेतला. यावर नगर दक्षिणमधून विरोधकांनी खासदार विखेंवर टीका केली.

विखेंना नगर दक्षिणमधील मतदारांनी खासदार केले आणि साखर वाटप आहेत, नगर उत्तरेत. यावर खासदार विखेंनी नगर दक्षिणमध्ये साखर वाटण्यास सुरूवात केली. आता अयोध्यात सोमवारी (ता.22) प्रभू श्रीराम मूर्तीची स्थापना होत आहे. याचे निमित्त करून साखर आणि डाळ वाटप केली जात आहे. हे करताना लाडूचा प्रसाद करण्याचे आवाहन खासदार विखे करत आहेत.

(Edited By : Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT