nilesh lanke sunil tatkare sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sunil Tatkare On Nilesh Lanke : सुनील तटकरेंचे विधान अन् लंकेंच्या परतीचे दोर कापले

Pradeep Pendhare

नगर : 14 मार्च | पारनेरचे आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी आमदार लंकेंना सूचक इशारा दिला असतानाच, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ( Sunil Tatkare ) यांनी महायुतीचा धर्म आम्ही पाळणार आहोत, असे विधान करत आमदार लंकेंच्या परतीचे दोर कापले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्यापाठोपाठ प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे ( Sunil Tatkare ) यांनी आमदार नीलेश लंके ( Nilesh Lanke ) यांच्या शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशावर निर्णायक विधान केले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तटकरे म्हणाले, "आमदार लंकेंच्या भूमिकेविषयी अजून स्पष्टता नाही. लंकेंनी अजितदादांची बुधवारी भेट घेतल्याचेदेखील समजले. या भेटीचीदेखील माझ्याकडे माहिती नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते पक्षांतर करत असल्याचे समजत आहे. परंतु, महायुतीचे उमेदवार खासदार सुजय विखे यांना भाजपकडून उमेदवारीची घोषणा झाली आहे. महायुती म्हणून आम्ही पूर्ण ताकदीने नगर दक्षिणमध्ये उतरणार आहोत."

प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या या विधानावरून आमदार लंके यांच्या पक्ष परतीचे दोर पूर्णपणे कापल्याचे संकेत मिळत आहेत. तटकरे यांच्यापूर्वी अजितदादांनीदेखील आमदार लंके यांच्या पक्षांतरावर तिखट भाष्य केले आहे. "आमदार लंकेंना पक्षांतर करायचे असल्यास त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल," असं अजितदादांनी म्हटलं.

अजितदादा म्हणाले, "नीलेश यांना मी मनापासून आधार दिला होता. मदत केली आहे. परंतु, त्यांच्या डोक्यात काहींनी खासदारकीची हवा घातली आहे. त्यामुळे ते चुकीची भूमिका घेत आहेत. नीलेश लंकेंनी असा पक्ष सोडून जाऊ नये. नीलेश लंके हे पारनेरपुरतेच काम करू शकतात. बाकीच्या मतदारसंघात समजतात तेवढं सोपे नाही."

गेल्या काही दिवसांपासून आमदार लंके राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात येण्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्याला आज दुपारनंतर पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार आणि आमदार लंके हे एकमेकांना काही दिवसांपासून चकवा देत होते. परंतु, गेल्या दोन दिवसांपासून अजितदादांनी आमदार लंकेंना दूर केल्याचे झाकूनदेखील राहिले नाही.

अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतरानंतर अजितदादांनी त्यांच्या 'एक्स' खात्यावरून आमदार संग्राम जगताप आणि आमदार आशुतोष काळे यांना टॅग करत महत्त्वाची भूमिका निभावल्याचा उल्लेख केला. या वेळी आमदार लंकेंना अजितदादांनी डावलल्याचे दिसले. तसेच आमदार लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यापासून शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजितदादांचे छायाचित्र फलकावर लावत आले आहेत. विशेष म्हणजे, शरद पवार यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना छायाचित्र वापरल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिल्यानंतरदेखील आमदार लंके हे त्यांचे छायाचित्र फलकावर अजितदादांबरोबर लावत आले आहेत.

आमदार लंके आता पक्षांतर करत असताना लोकसभा निवडणूक लढवण्यावर स्पष्ट भाष्य करताना दिसत नसले, तरी त्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही, हेदेखील तेवढेच सत्य आहे.


( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT