Nilesh Lanke News : पुलाखालून बरेच पाणी जायचंय; आमदार लंकेंचा लोकसभेबाबतचा सस्पेन्स कायम

Political News : राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाबाबत आणि लोकसभा निवडणूक लढण्याबाबतची संदिग्धता आमदार नीलेश लंके यांनी कायम ठेवली.
Nilesh Lanke
Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

Nagar News : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार नीलेश लंके हे राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेशाचा मुद्दा एका वाक्यात संपवला. तोच आमदार लंके यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन मी कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्यांच्या संपर्कात नेते आहेत. त्यामुळे राजकारण कोणत्या वळणावर आणि कोणता टर्न घेईल, हे सांगता येत नाही. राजकारणात काही गोष्टी घडण्याअगोदर बोलणे योग्य नाही. अजून पुलाखालून बरेच पाणी जायचे आहे, असे सांगून शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाबाबत आणि लोकसभा निवडणूक लढण्याबाबतची संदिग्धता आमदार नीलेश लंके यांनी कायम ठेवली.

आमदार लंके यांचा रविवारी वाढदिवस झाला. 'दिल्ली अब दूर नही..', अशी जाहिरातबाजी कार्यकर्त्यांनी केली. वाढदिवसानंतर आज लगेचच ते पुण्याच्या दिशेने रवाना झाले. पुढे पुण्यात शरद पवार यांनी हे पत्रकार परिषद नियोजित केली होती. यामुळे आमदार लंके हे शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.

शरद पवार आणि आमदार लंकेंनी एकमेकांना चकवा दिल्यानंतर आमदार लंके यांनी खासदार अमोल कोल्हेंची भेट घेतली. यावर खासदार कोल्हे यांनी वेट अॅण्ड वाॅच असे सांगून आमदार लंकेंच्या प्रवेशाची राजकीय गाठ ताणून धरली. आमदार लंके यांनीदेखील टायमिंग साधत नगरला येऊन पत्रकार परिषद घेत पक्ष प्रवेश आणि लोकसभा निवडणूक लढवण्यावर भाष्य करत चर्चेचे राजकीय गुऱ्हाळ चालू ठेवल्याने संभ्रम वाढला आहे.

Nilesh Lanke
Maharashtra Cabinet Decisions : शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक; कॅबिनेटचे 19 महत्त्वाचे निर्णय...

आमदार लंके म्हणाले, "शरद पवार यांच्याबरोबर जायचे, असे अजून काही ठरले नाही. राजकारण क्षणाला, मिनिटाला बदलत आहे. राजकारणातील पुढच्या गोष्टीवर चर्चा करण्यात तथ्य आणि अर्थ नसतो. राजकारणात आता काही होईल अन् पुढे काय होईल, हे सगळे वेगळेच चित्र असते. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नगर दक्षिणमध्ये संपर्क वाढवला आहे. अनेकांची इच्छा आहे की, मी निवडणूक लढवावी. सहकारी मित्रांची पराकोटीची इच्छा आहे. ते संपर्कात आहेत. पण अजून तरी निवडणूक लढवण्याबाबत निर्णय घेतलेला नाही. राजकारण कोणत्या वळणावर जाईल हे सांगता येत नाही, हेदेखील सांगता येईल.

राजकारणात काही गोष्टी घडण्याअगोदर बोलणे योग्य नाही. अजून पुलाखालून बरेच पाणी जायचे आहे". लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांची इच्छा आहे. माझा कार्यकर्ता निर्मळ असल्याने त्यांना नेहमीच वाटते की, आपला नेता हा मोठा झाला पाहिजे, तशी कार्यकर्त्यांची इच्छाच असते. पक्षाने जबाबदारी दिल्यास, तयारीतच आहे. आपण खेळाडू आहे. आपण नेहमीच ग्राउंडवर असतो, असेदेखील आमदार लंके म्हणाले.

जाहिरातीवर 'दिल्ली अब दूर नही..', असे सूचक लिहित पक्ष चिन्ह आणि वरिष्ठ नेत्यांचे छायाचित्र नव्हते, याकडे लक्ष वेधल्यावर आमदार लंके म्हणाले, "नेत्याच्या वाढदिवसाची जाहिरात कार्यकर्ता करत असतो. त्या जाहिरातीत काय टाकतात, ते त्याचे तो ठरवतो. परंतु मी जर जाहिरात टाकली असतील, तर मला पक्षाच्या प्रोटोकाॅननुसार पक्षनेतृत्वाच्या छायाचित्रांसह द्यावी लागली असती. मला प्रोटोकाॅल आहेत. पण कार्यकर्त्यांना कुठलाच प्रोटोकाॅल नसतो". माझ्या आॅफिशियल पेजवरून काही पडल्यास त्यात तथ्य राहते, असेदेखील आमदार लंके यांनी म्हटले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीत राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आहे. नगर दक्षिणमध्ये खासदार सुजय विखे हे भाजपकडून आहेत. त्यांनी गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात केलेल्या विकासकामांकडे कसे पाहता? यावर आमदार लंके म्हणाले, "प्रत्येक पदाधिकारी, नेता, ज्याच्या त्याच्या जागेवर काम करत असतो. मी एक कार्यकर्ता, असा आहे की, कोण काय करते यापेक्षा आपलं काम करत राहायचे. आपल्या कामाला महत्त्व द्यायचे. त्याची रेष पुसण्यापेक्षा आपली रेष वाढवत राहायची. त्यामुळे दुसऱ्याकडे विनाकारण बोट दाखवायचे नाही.'

दुसऱ्याकडे एक बोट दाखवल्यास आपल्याकडे चार बोटे होतात. त्यामुळे काम करणाऱ्यांना काय नावे ठेवायचे". नगरमध्ये शरद पवारांचा मेळावा आहे. त्यात प्रवेश होणार आहे, असे सांगितले जात आहे. यावर आमदार लंके यांनी "कधी मेळावा आहे, हे मला माहीत नाही. कोणाला तरी विचारतो, मेळावा अधिकृत कधी आहे ते!, असे सांगून राजकीय पेच कायम ठेवला.

सगळे काय आंतर्यामी झाले की काय?

महायुतीत ही जागा भाजपकडे (Bjp) आहे. ही जागा राष्ट्रवादी काॅंग्रेसला (Ncp) मिळावी, यासाठी अजितदादांकडे मागणी करणार आहात का, यावर आमदार नीलेश लंके म्हणाले, "महायुतीच्या जागावाटपाचा निर्णय वरिष्ठ स्तरावर सुरू आहे. मी पक्षात शेवटचा घटक म्हणून काम करतो. शेवटच्या घटकाने उच्चस्तरावरील चर्चा न केलेली बरी". सकाळी आपला फोन संपर्क क्षेत्राबाहेर होता. यावर आमदार लंके म्हणाले, "वाढदिवसानिमित्ताने अनेक लोक भेटण्यासाठी आले. याचवेळी तब्येत काहीशी बरी नव्हती. प्रवासात असताना फोन सतत वाजत होता. त्यामुळे आरामासाठी फोन बंद केला. फोन बंद ठेवण्यासाठी मी काही मोठा नेता नाही".'शिवपुत्र संभाजी' महानाट्य सुरू झाल्यापासून प्रत्येक जण प्रवेशाचीच गोष्ट करतो. रविवारी वाढदिवसाच्या दिवशीदेखील तेच! प्रवेशाच्याच गोष्टी सुरू होत्या. मलाच माहीत नाही. पण, सगळे काय आंतर्यामी झाले की काय, हेच कळत नाही, असे आमदार लंके (Nilesh Lanke) म्हणाले.

(Edited By : Sachin Waghmare)

R

Nilesh Lanke
Nilesh Lanke: शरद पवारांसोबत लंके येतील का? तनपुरे म्हणाले,...घड्याळ काढून तुतारी वाजवण्यासाठी पुढे सरसावतील...

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com