अरविंद जाधव
Nashik News : महराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते अजित पवार यांनी नाशिकमध्ये ‘क्लीन’ उमेदवार हवा, असा आग्रह त्यांनी प्रमुख कार्यकर्त्यांकडे केला आहे. त्यादृष्टीने त्यांच्या काही गाठीभेटी देखील झाल्या आहेत. अजित पवारांच्या या भुमिकेने इच्छूक उमेदवारांच्या मनात उकळ्या फुटल्यात. मात्र नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवणाऱ्या माजी खासदार समीर भुजबळ यांचे काय, असा प्रश्न ही उपस्थित झाला.
अजित पवारांनी नाशिकमध्ये पक्ष बांधणीसाठी जोरदार तयारी केली आहे. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काठावर उभ्या असलेल्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मुंबईसह नाशिकमध्ये प्रत्यक्ष गाठीभेटी घेतल्या. त्यात अजित पवारांनी ‘क्लीन’ चेहराच हवा, असा अनेकदा उल्लेख केला. लोकसभेसाठी अजित पवार गटाकडून इच्छूक असलेल्या शिवाजी सहाणे यांना ही हाच संदेश देऊन काम सुरू करण्यास सांगितले. अर्थात हे काम थेट लोकसभेसाठी आहे की पक्ष म्हणून हे अद्याप स्पष्ट नाही. मात्र पवारांच्या ‘क्लीन’ चेहरा या मुद्यामुळे समीर भुजबळांना लोकसभेचे तिकीट मिळणार की नाही, असा असा प्रश्न ही उपस्थित होतो.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मराठा आरक्षणाचा मुद्दा जिल्ह्यात बराच गरम आहे. मराठा समाजाची एकगट्टा मते टाळणे कोणत्याही पक्षाला परवडणारे नाही. त्यातच छगन भुजबळ विरूद्ध मराठा समाज असे चित्रही जिल्ह्यात निर्माण झाले आहे. या वादाची किनार लक्षात घेता समीर भुजबळ यांच्यापेक्षा मराठा समाजाचा आणि राजकीय अथवा इतर वाद विवादांपासून दूर असलेला चेहरा देण्याचा प्रयत्न अजित पवार यांच्याकडून होत असावा, अशी शक्यता आहे.
तुर्तास नाशिक लोकसभा मतदार संघ नक्की कोणत्या पक्षाच्या वाट्याला जाणार हेच स्पष्ट नाही. पारंपारीक पद्धतीने या मतदार संघावर शिवसेना (शिंदे गट) आपला हक्क सांगणार आहे. शिवसेने विरोधात यापूर्वी राष्ट्रवादी ही लढतच राहिली आहे. आताच्या समीकरणांनुसार शिंदे गट आणि अजित पवार गटाला एका उमेदवाराची निवड करणे क्रम प्राप्त आहे. दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचा रसही लपून राहिलेला नाही. विरूद्ध बाजुला शरद पवार गटाकडून ही इच्छूकांना काम करण्यास सांगण्यात आले आहे. शिवसेनेच्या उबाठा गटाचे कार्यकर्त्यांचे तर कामही सुरू आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या क्लीन चेहऱ्याचा शोध नाशिक लोकसभा मतदार संघात पूर्णत्वास कसा जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
(Edited by Sudesh Mitkar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.