Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Teachers Constituency : अजित पवार गटात गोंधळ; अधिकृत उमेदवार महेंद्र भावसार हेच वाऱ्यावर

Nashik NCP Ajit Pawar : अजित पवार गटाचे बहुतांशी आमदार आणि नेते अधिकृत उमेदवारापासून दूरच

Sunil Balasaheb Dhumal

Nashik Political News : शिक्षक मतदारसंघाची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. प्रमुख उमेदवारांनी मतदारांना आपलेसे करण्याचे सर्व प्रयोग होत आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार महेंद्र भावसार मात्र चाचपडताना दिसत आहेत.

शिक्षक मतदारसंघाच्या या निवडणुकीत मतदानाला आता केवळ सहा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे उमेदवारांसाठी नेत्यांनी झोकून दिले आहे. यामध्ये सर्वाधिक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या उमेदवार भावसार यांना मात्र नेत्यांनीच वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.

भावसार यांच्यासाठी गेल्या आठवड्यात पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये बैठक घेतली. या बैठकीकडे पक्षाच्या प्रमुख आमदारांनीच पाठ फिरवली. नाशिक आणि नगर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अशीच स्थिती आहे.

नगरमध्ये आमदार आशुतोष काळे यांनी आपल्या स्थानिक राजकारणातील हिशेब चुकता करण्यावर भर दिला आहे. त्यांनी चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde गटाचे उमेदवार आमदार किशोर दराडे यांच्याशी जवळीक केल्याचे बोलले जाते. त्यांचे बहुतांशी कार्यकर्ते दराडे यांच्या प्रचारात दिसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

नाशिकमध्ये विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ Narhari Zirval यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांना आपल्या पाठिंबा जाहीर केला आहे. आमदार माणिकराव कोकाटे आणि सरोज अहिरे यांनी पक्षाचा उमेदवार कोण? हे अद्याप गुलदस्तात असल्याचे म्हटले आहे. त्यांनी देखील अपक्ष दराडे यांच्या बैठकीला हजेरी लावली होती.

नाशिक शिक्षकसाठी सर्व उमेदवारांसाठी संबंधित पक्षाच्या नेत्यांनी कंबर कसली आहे. जोरदार प्रचार सुरू आहे. वरिष्ठ नेते त्याबाबत रोज आढावा घेत आहेत. मात्र स्थानिक नेत्यांच्या व्यक्तिगत राजकीय अजेंड्यांमुळे आमदार आशुतोष काळे, आमदार झिरवाळ, माणिकराव कोकाटे यांचे विविध अजित पवार गटाचे आमदार अलिप्त आहेत.

मंत्री भुजबळ Chhagan Bhujbal हे देखील या निवडणुकीच्या प्रचारात किती सक्रिय आहेत हा प्रश्नच आहे. त्यामुळे एकंदरच अजित पवार गटाच्या उमेदवाराला नेत्यांनीच वाऱ्यावर सोडल्याचे चित्र आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT