Ajit Pawar NCP Ahilyanagar : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा अहिल्यानगरमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. आमदार संग्राम जगताप यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका सर्वश्रुत झाली आहे. अजित पवार यांनी त्यावरून दिलेली तंबी, देखील चर्चेत होती.
आता अजित पवार यांची राष्ट्रवादी अहिल्यानगरमधील पदाधिकाऱ्यांच्या ‘कलर पॉलिटिक्स’मुळे चर्चेत आली आहे. पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी पक्षाचा पंचा बाजूला सारत 'गुलाबी रंगाचा पंचा' परिधान केल्याने उधाण आलं आहे.
अहिल्यानगर शहरातील वाहतूक कोंडी आणि वाहतुकीसंदर्भातील विविध समस्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) पदाधिकाऱ्यांनी पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची भेट घेतली. संपत बारस्कर यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी यावेळी पक्षाच्या पंचाऐवजी गुलाबी रंगाचा पंचा घातला होता. महिला पदाधिकारी देखील यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी देखील गुलाबी रंगाचा पंचा घातला होता.
शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माजी शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी गुलाबी रंगाचा पंचा घातल्याने अनेकांचे लक्ष त्याकडे वेधले गेले. पंचावर ‘राष्ट्रवादी’ (एनसीपी) अशी अक्षरे होती. पक्षाचा पारंपरिक रंगाचा, चिन्हाचा पंचा बाजूला ठेवून गुलाबी रंगाचा पंचा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी घेतल्याने अहिल्यानगर शहरातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.
गुलाबी रंगाचा वापर करण्यामागे नेमकं कारण काय, याबाबत पक्षाने अधिकृत भूमिका मांडलेली नसली तरी विधानसभा निवडणुकीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) गुलाबी जॅकेट परिधान करून प्रचार केला होता, याचा उल्लेख शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी प्रतिक्रिया देताना केला. अजितदादांनी विधानसभा निवडणुकीतील प्रचारात, गुलाबी रंगाचा खुबीने वापर केल्याने पक्षाच् बदलेल्या नव्या रणनीतीकडे किंवा प्रतिमेकडे पाहिले जात आहे.
राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या या गुलाबी रंगाच्या पंचामुळे अजित पवार पक्षाची नवीन ‘कलर पॉलिटिक्स’ सुरू झाली का? अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे. शहराध्यक्ष संपत बारस्कर यांनी, "गुलाबी रंग अजितदादांनीच आणला आहे. गुलाबी जॅकेट. आम्ही आमदार संग्राम जगतापांचे फॉलोअर्स आहोत, अन् भैय्या अजितदादाचे, जसं पक्षं चालेल, तसं आमचं कामकाज चालतं."
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभा निवडणुकीनंतर हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. राज्यभरात ते हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. आमदार जगताप यांनी अचानक बदलेल्या या भूमिकेची पक्ष नेते अजित पवार यांनी देखील दखल घेतली होती. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या छत्रपती शिवाजी-फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारसरणीवर चालत असल्याची आठवण करून दिली. त्यानंतर देखील आमदार जगताप यांची हिंदुत्वाचीच राहिली आहे.
भाजपचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा काल अहिल्यानगर दौऱ्यावर होते. उपमुख्यमंत्री अजित पवार देखील दौऱ्यात सहभागी झाले होते. आमदार जगताप यांनी त्यांची भेट घेत, अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगर रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधलं. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लक्ष घालावे यासाठी अजितदादांची भेट घेऊन आमदार जगतापांनी भेट घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.