Devendra Phadanvis & Ajit Pawar Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ajit Pawar Politics: आश्चर्य...जिल्ह्यात जागा १५, अजित पवार गटाला हव्यात १२!

Sampat Devgire

NCP Vs BJP News: लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या टिकेचे व नाराजीचे लक्ष्य ठरलेल्या अजित पवार गटाच्या बैठकीत एक नवा पेच पहायला मिळाला. त्यामुळे उत्साही पदाधिकाऱ्यांना कसे आवरावे, यासाठी नेत्यांना धडपड करावी लागणार आहे.

विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व पक्षांनी केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट मागे पडला होता. आता तो जागा झाला आहे. जागा झाला हे म्हणण्याचे कारण देखील तसेच संयुकक्तिक आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी आज नाशिक जिल्ह्याच्या विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला. त्याला विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी चक्क भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार असलेल्या चार जागांवरच आपला दावा ठोकला.

हे कार्यकर्ते जागरूक आहेत की, झोपेत बोलत होते. अशी कुजबुज पक्षाच्या बैठकीतच सुरू झाल्याचे कळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटावर आधीच भाजपचे नाशिकचे नेते नाराज आहेत. त्याबाबत थेट वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत या पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघात भाजपला अपेक्षित मते मिळाली नाहीत, ही त्यांची नाराजी आहे. महायुतीच्या उमेदवारांना पिछाडीवर जावे लागले. त्याचा लाभ महाविकास आघाडीच्या उमेदवारांना झाला.

अजित पवार गटाचे आमदार असलेल्या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उमेदवाराला मतांची भरघोस आघाडी आहे. आज प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या बैठकीत पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अनेक विधानसभा मतदारसंघावर आपल्या दावा ठोकला. या पक्षाकडे आधीच सहा आमदार आहेत. याव्यतिरिक्त आणखी सहा मतदार संघाची मागणी या बैठकीत केली.

जिल्ह्यात मतदार संघ १५ आणि अजित पवार गटाला हवेत १२ अशी स्थिती आहे. हा फॉर्मुला पाहता आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या प्रश्नावर नाशिकच्या पदाधिकाऱ्यांचे विचार गृहीत धरल्यास वादाची ठिणगी पडणार हे मात्र नक्की.

आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी नांदगाव आणि इगतपुरी मतदार संघ अजित पवार गटाला हवेत, असा आग्रह धरला. या दोन्ही मतदारसंघात अजित पवार गटाचे कार्यकर्ते आणि पक्षाचे संघटन अतिशय सक्रिय आहे असे या पदाधिकाऱ्यांचे मत होते. दोन्ही मतदारसंघ अनुक्रमे काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे आहेत.

या व्यतिरिक्त सध्या भाजपचे विद्यमान आमदार असलेल्या चार जागांवरही अजित पवार गटाला आपले उमेदवार उभे करायची इच्छा आहे. यामध्ये भाजपच्या देवयानी फरांदे यांचा नाशिक मध्य, आमदार सीमा हिरे यांचा नाशिक पश्चिम, डॉ राहुल आहेर यांचा चांदवड-देवळा आणि आमदार बोरसे यांचा बागलाण मतदार संघ आहे.

विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत महायुतीचे सूत्र ठरलेले आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार पक्षाला बरोबर घेऊ नये, असाही एक मतप्रवाह होता. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार नाराज देखील होते.

त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुलासा करावा लागला होता. महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्रितपणे विधानसभा निवडणूक लढवतील, असे निश्चित करण्यात आले. मात्र तीनही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा वाढलेला आत्मविश्वास पाहता जागा वाटपामध्ये आत्ताच वादाची ठिणगी पडल्याचे चित्र आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT