Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जन सन्मान यात्रेला आज दिंडोरी मतदार संघातून सुरवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री पवार यांच्या बॅनरवर शरद पवार यांचे निकटवर्तीय श्रीराम शेटे यांचे फोटो आहेत. अजित पवार यांनी कार्यक्रमापूर्वी कादवा साखर कारखान्यावर श्रीराम शेटे यांची भेट घेतल्याने तो चर्चेचा विषय ठरला.
श्रीराम शेटे हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. दिंडोरी विधानसभा मतदारसंघावर त्यांची चांगली पकड आहे. त्यामुळे दिंडोरीचा आमदार कोण? याबाबत शेटे यांच्या भूमिकेला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार त्यांच्या भेटीला गेले असावे. या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उपमुख्यमंत्री पवार यांनी कादवा सहकारी साखर कारखान्याला भेट देत श्री. शेटे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी श्री. शेटे व कारखान्याच्या संचालक मंडळाने उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.
विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ देखील यावेळी उपस्थित होते. ही भेट सदिच्छा भेट होती. उपमुख्यमंत्री असल्याने आम्ही कारखान्यावर त्यांचे स्वागत केले, असे शेटे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधानसभा निवडणूक प्रचाराची सुरुवात आज पासून सुरू होत आहे. त्यासाठी नाशिक येथून जन सन्माननीय यात्रा काढण्यात आली. दिंडोरी विधानसभा मतदारसंघात त्याचा प्रारंभ झाला.
दुपारी नाशिकच्या काळाराम मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. आजपासून होणाऱ्या या दौऱ्याला विशेष महत्त्व दिले जात आहे. त्यानंतर पुढील पाच दिवस उपमुख्यमंत्री पवार पुणे जिल्ह्याचा दौरा करणार आहेत.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार आहेत. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची प्रचाराची सुरुवात झाली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव वाघ ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात नाशिकच्या काळाराम मंदिरातूनच केली होती. त्यामुळे उपमुख्यमंत्री पवार त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत हा कित्ता गिरवणार आहेत.
उपमुख्यमंत्री पवार आज आमदार झिरवाळ, आमदार दिलीप बनकर आणि आमदार सरोज अहिरे यांच्या मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यावेळी लाडकी बहीण योजना आणि शेतकरी यांच्याशी चर्चा यावर त्यांचा भर असेल.
या निमित्ताने पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री पवार निवडणुकीच्या माध्यमातून शरद पवार यांचा प्रभाव असलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकरी आणि निफाडच्या मतदारांची थेट संवाद साधणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे पवार पक्षाकडून या निमित्ताने शरदचंद्र पवार पक्षाच्या मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न मानला जातो.
या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांचे फोटो पवार यांच्या प्रचार दौऱ्यात झळकले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या अनेक नेत्यांना या निमित्ताने अजित पवार गटात ओढण्याचा प्रयत्न होईल. त्यात ते कितपत यशस्वी होतात, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा हा दौरा अजित पवार यांच्या राजकीय कारकीर्दीसाठीही आव्हानात्मक करणार आहे. शरद पवार यांना सोडून गेलेल्या अनेक आमदारांना आगामी निवडणुकीत परतीचे वेध लागले आहेत. यातील किती आमदार पुन्हा निवडून येतात, हा देखील चर्चेचा विषय आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.