Jalgaon Politics : जळगावात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आवारात रविवारी (दि. २५) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडला.
एकीकडे पुतळ्याचे अनावरण उत्साहात पार पडत असताना, दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अनिल पाटील यांनी पुतळ्याच्या उभारणीसाठी आलेल्या शासकीय अडचणींवरून सरकारला घरचा आहेर दिला. अजितदादांचा पुतळा उभारताना शासकीय अडथळे आल्याचे त्यांनी सांगितलं. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.
कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना आमदार अनिल पाटील यांनी काही शासकीय अधिकाऱ्यांनी पुतळा बसवण्याच्या प्रक्रियेत अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. एखाद्या पुतळ्यासाठी परवानगी मिळवताना जवळपास वर्षभराचा कालावधी लागतो, असेही त्यांनी सांगितले. परवानगीसाठी लागणारा विलंब पाहाता कागदपत्रांची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सरकारने पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
शहरात सट्टा आणि पत्त्यांचे क्लब खुलेआम चालतात, मात्र अजितदादा पवारांसारख्या मोठ्या नेत्याच्या पुतळ्याला परवानगी देण्यासाठी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक आडकाठी घातली जाते अशा शब्दांत त्यांनी प्रशासनावर टीका केली. अवैध धंद्यांना अधिकृत परवानगी नसतानाही ते सुरू राहतात. मग अशा गोष्टींवर नियंत्रण कसे ठेवले जाते, असा सवाल त्यांनी केला.
दरम्यान, अनिल पाटील यांनी उपस्थितीत केलेल्या या मुद्यामुळे पुतळा उभारणीसाठीच्या परवानगी प्रक्रियेचा आणि शासकीय अडथळ्यांचा मुद्दा चर्चेत आला आहे. माजी खासदार ईश्वरलाल जैन यांनीही या मुद्द्याला धरून प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत दिवंगत अजितदादा पवार यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिता वाघ, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, आमदार अनिल पाटील यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. स्थानिक सर्वपक्षीय नेत्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात उपस्थित मंत्री आणि आमदारांनी अजित पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.