Ahmednagar News Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar News : गुन्हेगारीवर नियंत्रण नसल्याचा आरोप; तोफखाना पोलीस ठाण्याचे निरीक्षक साळवेंच्या निलंबनासाठी राष्ट्रवादी आक्रमक

सरकारनामा ब्यूरो

- राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar:अहमदनगर शहर आणि उपनगरातील वाढत्या गुन्हेगारीमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गेल्या दीड महिन्यात तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत भरदिवसा तीन खून झाले असून विशेष म्हणजे ते भररस्त्यावर झालेल्या आहेत. या सर्व हत्यांमागे संघटित गुन्हेगारी, अवैध व्यवसाय, अवैध पद्धतीने जागा बळकावणे या सामायिक गोष्टी समोर येत आहे.

याचवेळी गुन्हेगारीवर कुठलेही नियंत्रण नसल्याचा आरोप आता तोफखाना पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यावर होऊ लागला आहे. याच पार्श्वभूमीवर साळवे यांचे निलंबन व्हावे अशी मागणी सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अभिजित खोसे यांनी केली आहे.

शहरातील पाच पोलीस ठाण्यांपैकी तोफखाना पोलीस ठाणे सध्या विविध कारणांनी वादग्रस्त बनले आहेत. तोफखाना पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांचे निलंबन व्हावे अशी मागणी खुद्द सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अभिजित खोसे यांनी केली आहे. साळवे हे अवैध व्यवसाय आणि संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण आणण्यात अपयशी असल्याचा आरोप अभिजित खोसे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांना भेटून निवेदन देत केला आहे. (Ahmednagar Political News)

बुधवारी शहरातील नामांकित महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यावर कोयत्याने हल्ला झाला. तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गेल्या दीड महिन्यात तीन खुना सारखे गंभीर गुन्हे व 307 सारखे अनेक गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहे. याचे पडसाद थेट विधानसभा अधिवेशनात पडत आहेत.

काँग्रेस गटनेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांनी अशा घटनांमुळे सरकारला अधिवेशनात धारेवर धरत जाब विचारला. शहरात शिवसेनेने आंदोलन केले. तर नुकतेच आमदार प्रसाद लाड यांनी नगर शहरात येत पोलिसांचा गोपनीय विभाग आणि जिल्हा गुन्हे अन्वेषण विभाग अपयशी ठरत असल्याचा घरचा आहेर लव्ह जिहाद प्रकरणी दिला.

यावर सत्तेत असलेले शहराचे राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी बोलत नसल्याचा आरोप होत असताना आता आमदार संग्राम जगताप(Sangram Jagtap) यांनी शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडल्याचे निवेदन सभागृहात केले तर शहराध्यक्षांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन देत पोलीस निरीक्षक साळवे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT