Nilesh lanke-Prajakt Tanpure-Sujay Vikhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Prajakt Tanpure : लंकेंच्या विजयानंतरही तनपुरेंच्या पदरी अधिकचा गृहपाठ, धाकले विखे डावपेचाचे प्रहार करणार?

Pradeep Pendhare

Ahmednagar Lok Sabha Election News : शरद पवारांचे निष्ठावान, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे भाचे, माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या राहुरी विधानसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार सुजय विखेंचे मताधिक्य घटवण्यात तनपुरेंना यश मिळालं. तनपुरेंच्या आगामी राजकीय करिअरसाठी सेफ वाटत असलं तरी, त्यांना विधानसभेसाठी अधिकचा गृहपाठ करावा लागणार आहे. विखे आता राजकीय भूमिकेतून बाहेर आहेत, त्यामुळे त्यांचे डावपेच अधिक प्रहार करणारे असतील, त्यामुळे तनपुरेंच विधानसभेपर्यंत सातत्यानं अभ्यासात डोकं खुपसून बसून यश खेचून आणण्याची तयारी करावी लागणार आहे.

नीलेश लंके यांना या राहुरी विधानसभा मतदारसंघातून 94 हजार 967 मते मिळाली, तर विखे यांना 1 लाख 6 हजार 903 मते मिळाली. विखेंना लंकेंपेक्षा 11 हजार 936 मते अधिक आहेत. विखेंना मिळालेल्या मतांमध्ये राहुरी मतदारसंघातून साठ ते 70 हजारांचे मताधिक्य हवे होते. ते त्यांना मिळाले नाही.

राहुरी मतदार संघ हा माझा होम ग्राउंड आहे, असे खासदार विखे प्रचारात सातत्याने सांगत होते. चार जूननंतर राहुरी कोणाची आहे, हे विखे यांना समजेल, असे आमदार तनपुरे सांगत होते. मागील निवडणुकीत विखे यांना या मतदारसंघात 71 हजार 803 मताधिक्य होते. या निवडणुकीत 25 जार 205 मतदान वाढलेले असूनही त्यांचे मताधिक्य कमी करण्यात आमदार प्राजक्त तनपुरेंना यश आले. आमदार तनपुरे यांची राजकीय ताकद या विजयाने वाढली. तनपुरे यांनी ही निवडणूक अंत्यत प्रतिष्ठेची केली होती. त्यांच्या संघटनात्मक बांधणीवरच लंकेची भिस्त होती.

रणांगणात आणि राजकीय युद्धात विरोधकांच्या त्रुटी शोधून त्यावर नेमका प्रहार करण्याचे धोरण महाविकास आघाडीने अवलंबले होते. कांदा निर्यात बंदी, दुधाचे (Milk) घसरलेले दर, संविधानातील कथित बदल, धार्मिक ध्रुवीकरण या आधारावर मतदारांचे नरेटिव्ह सेट करण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली. यातच अति आत्मविश्वासात दाखवत विखेंनी राहुरीकडे दुर्लक्ष केले. महागाई, बेरोजगारी असे प्रश्न मदतीला होतेच. तसेच नगर-मनमाड महामार्गाचा प्रश्न, बंद पडलेला डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखाना अशा अनेक स्थानिक कळीच्या मुद्द्यांवर नीलेश लंके यांनी प्रहार केले.

विखे मात्र ही निवडणूक राष्ट्रीय प्रश्नावर लढवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा, राम मंदिर, 307कलम, सीएए कायदा, राष्ट्रीय सुरक्षा, देशाचा विकास, आर्थिक महासत्ता, अशा ग्लोबल मुद्द्यांवर विखे यांनीही निवडणूक नेण्याचा प्रयत्न केला. आपली विकास कामांचे प्रगती पुस्तक, व्हिजन ही त्यांनी मांडले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) सभेच्या जादूपेक्षा लंकेंचा शेतकऱ्यांचा अजेंडा भारी भरला. मतदारांच्या दृष्टीने त्यांच्या जीवनामरणाचे दैनंदिन राहणीमानाशी निगडित प्रश्नांचा प्रभाव अधिक होता.

स्थानिक प्रश्नांच्या प्रभावाकडे प्रचारात दुर्लक्ष झाले. किंबहुना विखे यांना त्यात बचावात्मक पातळीवर जावे लागले. यावेळी अँन्टिइनकमबन्सी फँक्टरने नीलेश लंकेचे काम बरेचसे सोपे केले होते. या सर्वाचा परिणाम विखेंचे मताधिक्य घटण्यात झाला. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी भक्कमपणे विखे यांना साथ दिली. एकतर्फी किल्ला त्यांनी लढविला. नरेटिव्ह सेट करुन निवडणूक जिंकता येते हे यावेळी सिद्ध झाले. मात्र आता तनपुरे यांची वाढलेली ताकद ही आगामी राजकारणाच्या दृष्टीने विरोधकांच्या पुढे मोठे आव्हान असणार आहे.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT