Amalner News: आगामी लोकसभा व त्यानंतर येणारी विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. याच पार्श्वभूमीवर प्रतिपंढरपूर समजल्या जाणाऱ्या अमळनेरात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तब्बल १४ वर्षांनंतर दाखल होणे, ही बाब अनेकांसाठी अभिमानास्पद व सर्वांसाठी भुवया उंचवणारी ठरली आहे.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, (Ajit Pawar) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) या ‘मांदियाळी’ने वातावरण ढवळून निघाले. प्रत्येक जण आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी धडपडत होते. मात्र, दिग्गज नेत्यांचा अमळनेर (Jalgaon) दौरा पक्षाला बळकटी व ‘भाकरी फिरवणारा’ ठरणार आहे, एवढे मात्र निश्चित!
दिग्गज नेते कोणाच्या निवासस्थानी जातात?
राष्ट्रवादी ग्रंथालय विभागाचे प्रदेशाध्यक्ष उमेश पाटील व ग्रंथालय विभागाच्या प्रदेश समन्वयक रिताताई बाविस्कर यांच्या प्रयत्नांनी शरद पवार राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिराच्या उद्घाटननिमित्ताने दाखल झाले होते. त्यांच्या साथीला अजित पवार, जयंत पाटील यांच्यासह सर्व टीम होती. आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानापासून निघालेला "रोड शो" लक्षवेधी ठरला. दरम्यान दिग्गज नेते हे कोणाच्या निवासस्थानी जातात, कोणाच्या घरी नाश्ता तसेच भोजनाचा आस्वाद घेतात याची उत्सुकता अनेकांनी लागली होती. कोण कोणाला भेटतो यावरूनही चर्चेला उधाण आले होते.
कार्यकर्त्यांची विचारपूस..
शरद पवार यांनी आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर पवार थेट भोजनासाठी उमेश पाटील यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी तब्बल एक ते दीड तासापर्यंत भोजनासह विविध विषयांवर चर्चा केली. त्यांच्यासमवेत अजित पवार व जयंत पाटील यांचीही उपस्थिती होती. वयाची ८० पार केलेला हा नेता कार्यकर्ता शिबिरावेळी सामान्य कार्यकर्त्यांची विचारपूस व काळजी घेताना दिसला.
..त्याला काही टीप्स दिल्या
पवार यांनी नेत्यांना योग्य वेळी दिलेल्या सूचना या अनेकांसाठी दिशादर्शक ठरणार आहेत.आगामी निवडणुकीत ‘प्लॅन बी’ तयार करण्यावर ही या नेत्याचा भर दिसून आला.
शरद पवार यांच्या सूचनेवरून अजित पवार यांनी जिल्हा बँकेच्या संचालिका तिलोत्तमा पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली, अन् विशेष म्हणजे जाताना वाहनात वेदांशू पाटील या युवा कार्यकर्ताला सोबत घेतले. त्याला काही टीप्स पण दिल्यात. (राजकीय नव्हे) एक दिवस अगोदरच त्यांनी एका नामांकित हॉटेलमध्ये मुक्कामी होते.
‘क्रांती पर्व स्मारक’ जागेची पाहणी
आमदार अनिल पाटील यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतल्यानंतर कार्यकर्त्यांच्या ‘रोड शो’मध्ये सहभागी झाले. विरोधी पक्षनेते अजित पवारांनी ग्रंथालय शिबिराच्या समन्वयक रिता बाविस्कर यांच्या निवासस्थानी जाऊन पक्षासाठी ‘महिला सशक्तीकरण’ला बळकटी दिली. मंगळग्रह मंदिरात शेतकऱ्यांसाठी प्रार्थना केल्यानंतर माजी नगरसेवक श्याम पाटील यांच्या विनंतीवरून ढेकू रस्त्यावरील ‘क्रांती पर्व स्मारक’ जागेची पाहणी करून उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले.
ॲड. ललिता पाटील राष्ट्रवादीत ?
‘राष्ट्रवादी’चे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी सकाळी आठला येथील स्थानिक ‘भाजप’च्या ज्येष्ठ नेत्या ॲड. ललिता पाटील यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. अचानक झालेल्या या भेटीने चर्चेला उत आला होता, त्यांनी आपल्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करावा, यासाठी त्यांची भेट घेतली होती, असे तर्क वितर्क लावले जात होते. त्यानंतर जयंत पाटील यांनी तिलोत्तमा पाटील यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.