Raj Thackeray, Amit Thackeray Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Amit Thackeray Nashik : कायद्याच्या बालेकिल्ल्यात कॉलेजबाहेर टवाळखोरांचा त्रास; विद्यार्थिनींची अमित ठाकरेंकडे तक्रार, पोलिसांचा लगेचच दणका

Amit Thackeray Meets College Students in Nashik : महाविद्यालयाबाहेर टवाळखोरांकडून त्रास, विद्यार्थिनींची अमित ठाकरे यांच्याकडे तक्रार, पोलिस तत्काळ अॅक्शन मोडमध्ये.

Ganesh Sonawane

Amit Thackeray Nashik : नाशिक शहराची ओळख कायद्याचा बालेकिल्ला अशी आहे. पण याच कायद्याच्या बालेकिल्ल्यात कॉलेज तरुणींना टवाळखोरांच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे सध्या 'जेन जी' (Gen Z) युवा पिढीशी संवाद साधण्यासाठी राज्यभरातील महाविद्यालयांना भेटी देत आहेत. काल त्यांनी नाशिक शहरातील चार महाविद्यालयांना भेट देत तेथील झेन झींशी विविध प्रश्नांवर चर्चा केली.

शहरातील कर्मवीर शांतारामबापू कोंडाजी वावरे महाविद्यालय, कॉलेज रोडवरील आरवायके महाविद्यालय, केबीटी अभियांत्रिकी महाविद्यालय, केटीएचएम महाविद्यालय, के. के. वाघ महाविद्यालयाला त्‍यांनी भेट दिली. यावेळी सिडको परिसरातील व विद्यार्थींनीनी कॉलेजबाहेर टवाळखोरांचा त्रास होत असल्याची तक्रार अमित ठाकरेंकडे केली. विद्यार्थिंनीमध्ये असुरक्षिततेचे वातावरण असल्याचे सांगितले.

कॉलेजच्या बाहेर रोज टवाळखोर मुले उभे असतात आणि ते येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थिनींना विनाकारण त्रास देतात. तसेच बाहेरची अनेक मुले विनाओळख पत्राचे महाविद्यालयात शिरतात व त्रास देतात अशी तक्रार महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी ठाकरेंकडे केली. आमच्या सुरक्षेचे काय असा सवाल विद्यार्थिनींनी केला. त्यावर ठाकरे यांनी माझ्याकडे सर्व तुमच्या लेखी तक्रारी द्या, त्यावर निर्णय घेतो. त्याबद्दल मी कॉलेज व्यवस्थापनाशी बोलून आठवडाभरात समस्या मार्गी लावतो असं सांगितलं.

दरम्यान या गंभीर तक्रारीची नाशिक पोलिसांनी तत्काळ दखल घेतली आहे. नाशिक पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, अंबड पोलीस ठाण्याच्या पथकाने कॉलेज परिसरात टवाळखोरांविरुद्ध कारवाईचा धडाका सुरू केला आहे. सिडको परिसरातील कॉलेजबाहेर विनाकारण फिरणाऱ्या, ट्रिपल सीट गाड्या चालवणाऱ्या आणि टोळक्याने उभे राहून मुलींची छेड काढणाऱ्या टवाळखोरांना पोलिसांनी ताब्यात घेत चांगलाच पोलिसी खाक्या दाखवला आहे.

अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जयंत शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी महाविद्यालय परिसरात अचानक भेट देत कारवाई केली. विनाकारण थांबलेल्या सात तरुणांना ताब्यात घेऊन अंबड पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यांना समज देत भविष्यात महाविद्यालय परिसरात टवाळखोरी न करण्याच्या सूचना देण्यात आल्या. संबंधित कलमांनुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती शिरसाठ यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महाविद्यालय परिसरात नियमित पोलिस गस्त व कारवाई करावी, अशी मागणी यावेळी विद्यार्थी व नागरिकांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT